पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आजपासून आरोग्यकर्मी, कोरोना योध्दे, सहव्याधीग्रस्त ६० वर्षावरील नागरिकांना प्रिकॉशन डोस मिळणार


पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आजपासून आरोग्यकर्मी, कोरोना योध्दे, सहव्याधीग्रस्त ६० वर्षावरील नागरिकांना प्रिकॉशन डोस मिळणार
 पनवेल,दि.९: वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर  आजपासून दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेल्या आरोग्यकर्मी (हेल्थ वर्कर) , पहिल्या फळीतील कोरोना योध्दे( फ्रन्ट लाईन वर्कर )तसेच व्याधीग्रस्त (कोमाॅर्बिड) असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना "प्रिकॉशन डोस" दिला जाणार आहे. 9 ते 5 या वेळेत  "प्रिकॉशन डोस "सहा शासकीय लसीकरण केंद्रावर विनामूल्य देण्यात येणार आहे. सध्याच्या एकुणच परिस्थितीचा विचार करता आयुक्त गणेश देशमुख यांनी लाभार्थींना लवकरात लवकर आपले "प्रिकॉशन डोसचे"लसीकरण पूर्ण करावे असे आवाहन केले आहे.
      
       केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दुसरा डोस घेऊन 9 महिने किंवा 39 आठवडे पूर्ण झालेल्या आरोग्यकर्मी (हेल्थ वर्कर), पहिल्या फळीतील कोरोना योध्दे( फ्रन्ट लाईन वर्कर ) तसेच व्याधीग्रस्त असणारे (कोमाॅर्बिड)60 वर्षावरील नागरिकांनी लसीकरणासाठी येताना दोन्ही डोस पूर्ण झालेले प्रमाण पत्र, आपल्या आस्थापनेचे ओळखपत्र किंवा आपल्या विभाग अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आणणे आवश्यक आहे. हे लसीकरण कोणत्याही शासकीय लसीकरण केंद्रात नोंदणी करून किंवा वर नमूद केलेल्या कागदपत्रांसह थेट लसीकरण केंद्रावर जाऊन करता येणार आहे. याकरिता पनवेल महानगरपालिकेतर्फे टाटा हाॅस्पिटल खारघर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र खारघर, कर्नाटक संघ हाॅल नवीन पनवेल, काळभैरव मंगल कार्यालय कळंबोली, सुषमा पाटील हायस्कूल कामोठे, काळण समाज हाॅल पनवेल ही सहा केंद्रे सुरू करण्यात आली आहे.

     कोरोनाच्या या संकटात लसीकरण हे मोठे कवच असून अजूनही ज्या नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण केले नाही किंवा अपूर्ण आहे त्यांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांच्या लसीकरणासाठी पंधरा शासकिय लसीकरण केंद्रे सुरू आहेत .तसेच कोव्हीड लसीकरणामध्ये 15 ते 18 वयोगटातील मुलांचे रोज दहा शाळांमध्ये दहा टिमच्या माध्यमातून लसीकरण केले जात आहे.
Comments