राजीव गांधी मैदानालागत प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल आणि अनधिकृत मटण विक्रीला चाप..

पनवेल महापालिका अतिक्रमण विभागाने केली कारवाई

भाजप युवानेते प्रमोद भगत यांच्या प्रयत्नांना यश


पनवेल:
           महानगरपालिका हद्दीतील राजीव गांधी मैदान, आदई सर्कल, न्यू पनवेल येथे उघड्यावर प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल करून अनधिकृत मटण विक्रीला चाप बसला आहे. आज (बुधवार दि.१६ फेब्रुवारी) पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण पथकाकडून येथील अनधिकृत चिकन-मटण विक्रेत्यांवर व बेकायदेशीर दुकानांवर कारवाई करण्यात आली.
         कत्तल केलेल्या प्राण्यांची घाण याठिकाणीच फेकून दिल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आला होता. तसेच शेजारीच सार्वजनिक वाचनालय असल्याने नागरिकांना नाक बांधून राहावे लागत होते. त्याचबरोबर याठिकाणी चिकन, मटण, मासळी खरेदीसाठी आलेले नागरिक भर रस्त्याच्या मधोमध आपली वाहने पार्किंग करत असल्यामुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण होत होती. 
         मटण विक्रेत्यांनी याठिकाणी अनधिकृत दुकाने थाटून अतिक्रमणही केले होते. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बेकायदेशीर दुकानांवर वारंवार कारवाई करून सुद्धा याठिकाणी पुन्हा एकदा बोकड, कोंबड्या आदी प्राण्यांची उघड्यावरच कत्तल करून मांस विक्री सुरूच होती. भाजप युवा नेते प्रमोद भगत यांनी सदरची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. नियमांचे उल्लंघन करून उघड्यावर होणारी प्राण्यांची बेकायदेशीर कत्तल आणि अनधिकृत मटण विक्री थांबवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रमोद भगत यांच्यावतीने करण्यात येत होती. बुधवारी पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याठिकाणी कारवाई केली असून नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले. तसेच अतिक्रमण विभागाने नागरिकांच्या समस्यांची तात्काळ दखल घेतल्याबद्दल त्यांचे प्रमोद भगत यांनी नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.
Comments