ठाकरे सरकार पनवेल न्यायालयातील धोरणात्मक बाबींवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेईल : मंत्री सुभाष देसाई
पनवेल न्यायालय हे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श न्यायालय ठरावे : मंत्री सुभाष देसाई

ठाकरे सरकार पनवेल न्यायालयातील धोरणात्मक बाबींवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेईल : मंत्री सुभाष देसाई

पनवेल / प्रतिनिधी : - पनवेल न्यायालयासंबंधीच्या विविध धोरणात्मक बाबींवर चर्चा करून निर्णय घेणेकामी महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बैठकीची मागणी करणारे पत्र दि.०४/०२/२०२२ रोजी महाराष्ट्राचे उद्योग, मराठी भाषा विभागाचे कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई यांना देण्यात आले.

याप्रसंगी मंत्री सुभाष देसाई मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचेशी चर्चा करून लवकरात लवकर आयोजन करण्यात येईल व महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पनवेल न्यायालयातील धोरणात्मक बाबींवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेईल असा निर्धार बोलून दाखवत, याकामी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिले.

तसेच, पनवेल न्यायालयात न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो याबाबत माहिती दिली असता सुभाष देसाई संपूर्ण महाराष्ट्र राज्यात न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर कसा वाढवता येईल याचा अभ्यास करून, त्यावर धोरणात्मक निर्णय घेणेकामी शासनाचे मराठी भाषा विभागाचे अधिकारी यांचा गट पनवेल न्यायालयात पाठवणार असल्याचे सांगत पनवेल वकील एकजुटीचे कौतुक केले आणि पक्षकार, वकील वर्ग व एकंदरच न्यायालयीन कामकाजाचा दर्जा असाच उंचावत ठेवून पनवेल न्यायालय हे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श न्यायालय ठरावे अशा शुभेच्छा दिल्या.

पनवेल न्यायालयातील वकील अमर पटवर्धन यांचे कार्यालयात मंत्री महोदय सुभाष देसाई  आले असता सदर विषयाची मांडणी, पनवेल वकील संघटनेचा बुलंद आवाज अध्यक्ष मनोज भुजबळ आणि मंत्री सुभाष देसाई यांची याविषयावर चर्चा, भेट घडवण्यासाठी वकील अमर पटवर्धन यांनी यशस्वीपणे शिष्टाई पार पाडली.

याप्रसंगी मंत्री सुभाष देसाई त्यांचा बहुमोल वेळ देऊन सकारात्मक चर्चा करून मुख्यमंत्री तथा कायदा मंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन दिल्याबद्दल पनवेल वकील संघटनेचा बुलंद आवाज अध्यक्ष मनोज भुजबळ यांनी मंत्री सुभाष देसाई यांचे मनःपूर्वक आभार मानले.
Comments