तालुका पोलीस ठाणे बनले सर्वधर्मीय समभावाचे प्रतिक ; बांगलादेशीय महिलेला मिळवून दिला न्याय
पनवेल, दि.5 (संजय कदम) ः बांगलादेशातून नजर चुकीने भारतात आलेल्या एका महिलेला परत बांगलादेशात पाठविण्यास पनवेल तालुका पोलिसांना यश आले असून सदर महिलेला बांगलादेशात पाठविण्यासाठी सर्वधर्मियांनी सहभाग घेतल्यामुळेच हे शक्य झाले. त्यामुळेच पनवेल तालुका पोलीस ठाणे हे सर्व धर्मीय समभावाचे प्रतिक बनले आाहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उप निरीक्षक तारु यांना गस्तीदरम्यान एक महिला जखमी व बेवारस स्थितीत रस्त्यावर मिळुन आल्याने त्यांनी तिला सिल आश्रम, वांगणी, नेरे, ता.पनवेल येथे सुरक्षिततेकामी ठेवले होते. सदर महिलेस तिचे पुर्ण नाव व गाव सांगता येत नव्हते व तिला त्वचारोग व मानसिक आजार असल्याने सिल आश्रम, पनवेल यांनी तिच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार व मानसोपचार तज्ज्ञांकडून तिचे समुपदेशन केले असता ती पुर्णपणे शुद्धीवर आली.सदर महिलेकडे त्यांनी चौकशी केली असता ती मुळची बांगलादेशी नागरीक असल्याचे तिने सांगतिलेने सिल आश्रम यांनी सदर बाबत इकडील पोलीस ठाणेस कळविले.सदर महिलेची चौकशी केली असता तिने स्वतः हुन ती घुसखोर बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली.तिने तिचे पुर्ण नाव हसिना (हसन बाबु)मूळ राहणार :-बांगलादेश असल्याचे सांगितले. सदर घुसखोर बांगलादेशी नागरिक महिले विरुद्ध इकडील पोलीस ठाणेत पोलीस नाईक अधिकारी यांच्या तक्रारीवरून पारपत्र(भारतातप्रवेश )नियम,1950 कलम 3(अ),6(अ) सह परकीय नागरिक आदेश,1948 नियम-3 सह परकीय नागरिकांचाकायदा,1946 चे कलम 14(सी) अन्वये गुन्हा दाखल करून सदर महिलेस 14.59 वा.अटक केली.तिला मा.जेएमएफसी,पनवेल यांच्यापुढे दोषारोप पत्रासह हजर केले असता मा. न्यायालयाने सदर महिलेस दोषसिद्ध ठरवून तिला 1000/- रू. दंड व दंड न भरल्यास 07 दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावलेली आहे. सदर महीलेने दंडाची पूर्ण रक्कम भरलेली आहे. सदर महिलेस डिपोर्ट करण्याची तजवीज ठेवलेली होती. सदर दोषसिद्ध घुसखोर बांगलादेशी नागरिक महिलेस तिचे मुळ गावी डिपोर्ट करेपर्यंत तिला सिल आश्रम,पनवेल येथे ठेवलेले आले. तिने सिल आश्रम सोडुन इतरत्र कोठेही जावु नये याकरीता तिचे हालचालीवर निर्बंध लादण्याबाबत परकीय नागरिकांचा कायदा,1946 चे कलम 3 (2)(ई)(आय)(आयआय)अन्वये आदेश पारित करण्याकरिता अधिकार्यांची तजवीज करण्यात आली होती. सदर महिलेला सील आश्रम येथील फादर फिनिक्स व कॉडीनेटर जैन्नम्मा यांनी अहोरात्र मेहनत घेवून तिच्या त्वचा रोगावर उपचार केले तसेच तिला बोलती केली. त्यांच्या प्रयत्नामुळेच ती बांगलादेशामध्ये तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधू शकली. त्यानंतर तिला बांगलादेश येथे पाठविण्याकरिता वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर व त्यांचे रायटर विलास साळवी यांनी सुद्धा शासकीय कागदपत्रामध्ये मेहनत घेवून सदर महिलेला सुखरुपपणे बांगलादेशात कसे पाठविता येईल यासाठी तेथील अधिकारी वर्गाशी संपर्क साधून ती मुळ गावी राहत असलेल्या तिच्या कुटुंबियांची माहिती घेतली व त्या आधारे शासनाच्या मदतीने आता तिला तिच्या मुळगावी सोडण्यात येणार आहे. यामुळे ती आनंदी असली तरी भारतीयांनी दिलेले प्रेम पुढील आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही अशा भावना तीने यावेळी व्यक्त केल्या आहेत.
फोटो ः हसीना सह पोलीस अधिकारी