नाशिक येथील स्पर्धेत रायगडचा औरंगाबाद वर विजय..
पनवेल वैभव वृत्तसेवा : -
नाशिक येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रितांच्या स्पर्धेत, रायगड संघ आपल्या गटातील शेवटचा सामना 13 व 14 फेब्रुवारी 2022 रोजी औरंगाबाद विरुद्ध गोल्फ क्लब मैदानावर खेळला. या सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विजय मिळवून रायगड संघाने गटात प्रथम स्थान प्राप्त केले व सुपर लीग स्पर्धेकरता पात्र ठरण्यात यशस्वी झाला. औरंगाबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने 71.2 षटकांमध्ये 242 धावा केल्या. त्यांच्या आरेझ खान याने 87 चेंडूत 67 धावा केल्या. रायगडच्या अमय भोसले याने 17.2 षटकांत 60 धावा देऊन पाच बळी घेतले. रायगड संघाची सुरुवात खराब झाली धावफलक 23 धावात 2 बळी असे दर्शवत असताना संघनायक ओम म्हात्रे 135 चेंडूत 58 धावा व निर्जल पाटील 88 चेंडूत 31 धावा या दोघांनी मिळून तिसऱ्या गड्या करता 168 चेंडूत 80 धावांची भागीदारी केली. त्यानंतर हे दोघेही फलंदाज पाठोपाठ बाद झाल्याने रायगडचा धावफलक 2 बाद 103 वरून चार बाद 107 असा झाला. स्मित पाटील व पार्थ पवार यांनी 183 चेंडूत 86 धावांची भागीदारी करून पहिल्या डावातील आघाडीचे उद्दिष्ट दृष्टिपथात आणले. यामध्ये पार्थ पवार याने 101 चेंडूत 37 धावा केल्या. स्मित पाटील याने उर्वरित फलंदाजांबरोबर 31 व 27 धावांच्या दोन छोट्या-छोट्या भागीदाऱ्या करून पहिल्या डावात आघाडी प्राप्त केली. स्मित पाटील 130 चेंडूत 81 धावा काढून नाबाद राहिला. रायगड संघाने 90 षटकात 9 बाद 253 धावा केल्या व 11 धावांची पहिल्या डावात आघाडी घेतली. अशाप्रकारे रायगड संघाने आपल्या गटामध्ये अव्वल स्थान प्राप्त केले व सुपर लीग स्पर्धेकरता देखील पात्रता मिळवुन इतिहास घडवला.
हिंगोली नाशिक औरंगाबाद ह्या तीनही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केलेले खेळाडू, द्रुतगती गोलंदाज अमेय पाटील 18 बळी साईराज जोशी 9 बळी ऑफ स्पिनर पैकी शौर्य गायकवाड 7 बळी, अमय भोसले 5 बळी व ओम म्हात्रे चार बळी तसेच फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा क्रिश भाइरा 151 स्मित पाटील 119 ओम म्हात्रे 109 व यष्टीरक्षक पार्थ पवार 70 धावा यांनी दमदार कामगिरी केली.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी ह्या संघाचे व्यवस्थापक कम प्रशिक्षक जॉन्टी गिलबिले सर, निवडसमिती सदस्य जाॅन्टी गिलबिले सर, सुमित झुंझारराव सर, विनेश ठाकुर सर व अजित म्हात्रे सर या सर्वांचे विशेष कौतुक केले आहे. तसेच असोसिएशनच्या सर्व सभासदांनी देखील या संघाचे अभिनंदन केले आहे. भविष्यात या सर्व मुलांवर लक्ष देण्यात येईल असे असोसिएशन चे अध्यक्ष चंद्रकांत मते यांनी जाहीर केले.