कायस्थ स्पंदन वाचकांच्या सेवेत पुन्हा एकदा रुजू..

मुक्ताताई गुप्ते यांच्या शुभहस्ते पुनर्प्रकाशन संपन्न

      
पनवेल / प्रतिनिधी  : -  पनवेलच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाचे मुखपत्र असणारे कायस्थ स्पंदन हे त्रैमासिक  मंगळवार दिनांक ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाचकांच्या सेवेत पुन्हा एकदा रुजू झाले. कोविड कालखंडात अख्खे जग थांबले असताना संपादकीय मंडळाने कायस्थ स्पंदन चे प्रकाशन हेतुपुरस्सरपणे थांबविले होते. विशेष म्हणजे पुनश्च हरिओम करताना कायस्थ स्पंदने हे डिजिटल स्वरूपामध्ये वाचकांपर्यंत पोहोचणार आहे.
       बुद्धी,शौर्य आणि ईमान यांचे उपजतच वरदान असणाऱ्या या समाजाच्या अंतर्गत परिसंचरण करण्याच्या उद्देशाने कायस्थ स्पंदन चे प्रकाशन करण्यात येते. डिजिटल स्वरूपामध्ये प्रसिद्ध होणार असल्याकारणाने राज्यासह देशाच्या सीमा ओलांडत देश-विदेशातील कायस्थ बांधवांपर्यंत हे प्रकाशन पोहोचणार आहे. पुनर्प्रकाशन सोहळ्याला मुक्ताताई किशोर (राजू शेठ) गुप्ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  उपस्थित होत्या. तर पनवेल सीकेपी समाजाचे उपाध्यक्ष, पत्रकार नितीन देशमुख आणि संपादिका मीनल रणदिवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
        श्री लक्ष्मीनारायणाच्या चरणाशी त्रैमासिकाचे पहिले पुष्प अर्पण केल्यानंतर मुक्ताताई गुप्ते यांनी अंकाचे अनावरण केले. संपादकीय मंडळ सदस्य तथा माजी सचिव मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. मीनल रणदिवे यांनी आपल्या मनोगतातून मुद्रित प्रकाशना ऐवजी डिजिटल प्रकाशन करण्याच्या निर्णयाबाबत उपस्थितांना अवगत केले.तसेच कायस्थ स्पंदन मधील सदरे लेख आणि आगामी उपक्रमांबाबत देखील उपस्थितांशी संवाद साधला.
       उपाध्यक्ष नितीन देशमुख यांनी डिजिटल स्वरूपात प्रकाशन करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले तसेच संपादकीय मंडळाला जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा विश्वस्त मंडळ त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असेल अशी ग्वाही दिली.मुक्ता ताई गुप्ते यांनी कायस्थ स्पंदन च्या पहिल्या डिजिटल अंकास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच या प्रकाशनाचा त्रैमासिक ते दैनिक हा प्रवास लवकरात लवकर पूर्ण होवो अशी सदिच्छा व्यक्त केली.शिरीष सबनीस यांनी श्री लक्ष्मीनारायणाची सुंदर छबी वापरून मुखपृष्ठ आरेखीले असून अत्यंत कल्पक पद्धतीने अक्षर जुळवणी केल्याने कायस्थ स्पंदन चा पहिला डिजिटल अंक अत्यंत वाचनीय झाला असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
        कार्यक्रमाला खजिनदार श्रीकृष्ण चित्रे, सचिव गिरीश गडकरी, विश्वस्त महेश कर्णिक, उल्हास शृंगारपुरे,सह सचिव संदीप देशमुख
आदी मान्यवरांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments