पनवेलमध्ये व्यवसाय आणि अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबिराचा शुभारंभ..

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा स्तुत्य उपक्रम

पनवेल : पनवेल मध्ये प्रथमच पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम  म्हात्रे यांच्या संकल्पनेतून  एका छत्राखाली व्यवसाय आणि अर्थसहाय्य शिबिराचे आयोजन ज्यात केंद्र सरकारचे विविध कोर्सेस ची माहिती देण्यासाठी संबंधित विभागातील अधिकारी उपस्थित होते. 
तसेच कोर्स पूर्ण झाल्यावर आवश्यक ते परवाने काढण्यासाठी नियोजन असल्याने कोर्स पूर्ण करून परवाने काढल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार मार्फत विविध सबसिडी कर्जही मिळतील. ते मिळण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विविध नॅशनलाईज बँकांचे प्रतिनिधी सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. हे शिबिर युवक, महिला आणि तृतीय पंथी अशा प्रत्येक स्तरातील नागरिकांसाठी मोफत आयोजित करण्यात आले होते.
       शेतकरी कामगार पक्ष , जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था व लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसाय व अर्थसहाय्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत  फडके नाट्यगृहात  मार्गदर्शन घेणाऱ्या सदस्यांना व्यवसाय आणि अर्थसहाय्य मार्गदर्शक  म्हणून खादी ग्रामोद्योग आयोगाचे श्री.नारायण कांबळे सर व राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ चे श्री.कांतायन जिन्हा,तसेच इंडियन चेंबर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस चे श्री.केलविन मेहता, तंत्राज हेल्थ केअर ब्युटी वेलनेस संचालिका डॉ.पल्लवी शिंदे , नॅशनलाईज बँकेचे सल्लागार, रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सौ.सोनल पाटील अश्या  विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांची उपस्थिती मध्ये मार्गदर्शन शिबिर पार पडले.
       यावेळी अनेक लघु उद्योजकांना त्यांच्या यशस्वी कारकिर्दी बद्दल  सन्मान  देऊन त्यांच्या अनुभवातून आणि प्रेरणादायी मार्गदर्शनातून  उपस्थित लोकांना वास्तविक माहिती  ऐकायला मिळाली. कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम जे. म्हात्रे उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जे.एम.म्हात्रे  चॅरिटेबल संस्थेच्या संचालिका ममताताई प्रितम म्हात्रे, नगरसेविका डॉ.सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, ज्येष्ठ नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे, युवा नगरसेवक  रवींद्र भगत, लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशनच्या अध्यक्ष मंजुषा परब , कर्नाळा दैनिकाचे संपादक हरेश मोकल व पत्रकार वर्ग तसेच अनेक लाभार्थ्यांनि हजेरी लावली.
       आपल्या पनवेल आणि उरण परिसरामध्ये नवीन प्रकल्प येत आहेत परंतु त्यावेळी आपल्या परिसरातील तरुणांना स्किल डेव्हलपमेंट चे प्रशिक्षण नसल्यामुळे त्याठिकाणी नोकरभरतीमध्ये त्यांना प्राधान्य दिले जात नाही यासाठी आमचे नेते आणि जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांच्या संकल्पनेतून आम्ही आज हे शिबीर राबविले. ज्यामध्ये भविष्यात येणाऱ्या प्रकल्पामध्ये स्थानिक तरुणांना आवश्यक ते कोर्सेस केल्यामुळे प्राधान्य दिले जाईल. यापुढेही प्रितम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल-उरण-खालापूर तालुक्यामध्ये अनेक शिबिर आयोजित करणार आहोत अशी माहिती शेकाप युवानेते मंगेश अपराज यांनी दिली.
Comments