शेलघर येथील पत्रकार परिषदेत भानुदास माळी यांनी दिली माहिती.
पनवेल वैभव वृत्तसेवा : - सध्या इतर मागासवर्गीय (ओबीसी )आरक्षणाचा ज्वलंत मुद्दा देशभर चर्चीला जात आहे. याच विषयावर विचार मंथन करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 12 जून 2022 रोजी सकाळी 9 ते सायं 7 या वेळेत रामशेठ ठाकूर कॉम्प्लेक्स, शेलघर, उलवे नोड येथे करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री महोदय उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग आयोजित ओबीसींचे एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबिरा संबंधी सविस्तर माहिती देण्यासाठी शुक्रवार दिनांक 10 जून 2022 रोजी सायंकाळी 4:30 वाजता समाज मंदिर हॉल शेलघर येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भानुदास माळी बोलत होते.
पत्रकार परिषदेत माहिती देताना भानुदास माळी यांनी सांगितले की राज्यात कुठेही झाला नसेल असा भव्य दिव्य असे ओबीसींचे एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबीर कोकणचे भाग्य विधाते बै. अंतूले साहेबांच्या पावन पवित्र भूमीत घेण्यात येणार आहे. या मंथन शिबिरात विविध विषयावर चर्चा होऊन काही महत्वाचे धोरणत्मक निर्णय घेण्यात येणार आहे. या मंथन शिबिराचे लाईव्ह सर्वत्र दाखविण्यात येणार आहे. हे शिबीर लाईव्ह असल्याने काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, नेते राहुल गांधी हे शिबीर लाईव्ह बघणार आहेत. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने ओबीसी आरक्षणाच्या नावाखाली जनतेची, ओबीसी समाजाची दिशाभूल केली आहे. इम्पिरियल डाटा लपवून ठेवले आहे. ओबीसी समाजाच्या अधोगती साठी भाजप जबाबदार आहे. आमच्या काँग्रेस पक्षात सर्व जाती धर्माची व्यक्ती आहेत. पक्षात सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी व समान न्याय दिला जातो. देशात राज्यात ओबीसी समाजाचे अनेक आमदार, खासदार, मंत्री, प्रतिनिधी आमच्या पक्षातील आहेत. पक्षाने सर्व समाज घटकांना न्याय दिला आहे.आम्हाला कोणाला फसवायचे नसून ओबीसी आरक्षण कसे टिकेल, ओबीसी समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी आमच्या काँग्रेस पक्षाचे प्रयत्न सुरु आहेत. ओबीसी आरक्षण कसे टिकेल यासाठी काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रयत्न चालू आहे. ओबीसी समाजात जनजागृती करून त्यांची वज्रमूठ बांधून योग्य ते वैचारिक परिवर्तन करण्यासाठी हे मंथन शिबीर आहे. या मंथन शिबिराला उदघाटक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव, अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले, तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तारीक अन्वर, सरचिटणीस मुकुलजी वासनिक, राष्ट्रीय को ओरडीनेटर के राजू, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्राचे प्रभारी एच के पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकरावजी चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक कल्याण क्रीडा मंत्री सुनिलजी केदार, मंत्री विजयजी वडेट्टीवर,युवा नेते सतेज पाटील, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, सहकार राज्य मंत्री विश्वजीत कदम, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदी मंत्री महोदय व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.तेंव्हा हे मंथन शिबीर एतिहासिक व क्रांतिकारी ठरणार आहे अशी माहिती यावेळी भानुदास माळी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेत भाजपचा खरपूस समाचारही भानुदास माळी यांनी घेतला. ओबीसी आरक्षण व त्या संबंधित इतर ध्येय धोरणे संबंधी विचार मंथन शिबीर 12 जून 2022 रोजी शेलघर येथे आयोजित केल्याचे सांगत त्यांनी सर्व पत्रकारांना कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाला व्यापक प्रमाणात प्रसिद्धी द्यावी अशी विनंती केली.
शेलघर येथील पत्रकार परिषदेत व्यासपीठावर रायगड जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावर तसेच काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.