भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने नवी मुंबई डाक विभागामार्फत नागरिकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन..


नवी मुंबई, - : भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागरिकांना अधिकाधिक तत्पर व गुणवत्ता पूर्व सेवा देण्यासाठी भारतीय डाक विभाग विविध योजना राबवित आहे. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई डाक विभागामार्फत डाक विभागाच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. भारतीय डाक विभाग टपाल सेवेबरोबरच समाजातील सर्व घटकांसाठी विविध प्रकारच्या बचत योजना उपलब्ध करुन देत आहे. दहा वर्षाच्या आतील मुलींसाठी  ‘सुकन्या समृद्धी योजना’ वरिष्ठ नागरिकांसाठी ‘सीनियर सिटीजन सेविंग स्कीम’ ‘मासिक उत्पन्न योजना’ नागरिकांना विमा कवच पुरवण्यासाठी ‘टपाल जीवन विमा’ ग्रामीण टपाल जीवन विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन उपलब्ध करून देण्यासाठी ‘अटल पेन्शन योजना’, त्याचबरोबर आवर्ती ठेव योजना, ‘पब्लिक प्रॉव्हिडंट फंड’ ‘मुदती ठेव योजना’ यासारख्या विविध बचत व विमा योजना डाक विभागामार्फत राबवल्या जातात.              
जगातील सर्वात मोठ्या टपाल जाळ्याला आधुनिकतेची जोड देत भारतीय डाक विभाग ‘इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या’ माध्यमातून बँकिंग क्षेत्रात सुद्धा उतरले आहे. समाजातील सर्व घटकांचे आर्थिक समावेशन करण्यासाठी डाक विभाग प्रयत्नशील आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून पोस्टमन बांधव नागरिकांना घरपोच ‘आधारसेवा’ ‘जीवन प्रमाण प्रमाणपत्र सेवा’ ‘टाटा एआयजी अपघाती विमा’ ‘प्रधानमंत्री फसल बिमा योजना’ यासारख्या सुविधा देत आहेत.              
नवी मुंबई शहरात व ग्रामीण भागातील विविध खेड्यांमध्ये शिबीरांचे आयोजन करून नागरिकांना त्यांच्या घराजवळ विविध सुविधा उपलब्ध करून देत आहेत. भारतीय डाक विभागाच्या योजना या नागरिकांच्या अधिक फायद्याच्या असून आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन या सुविधांचा  लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक श्री. नितीन येवला  यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
Comments