घरफोडीत १० लाखांचे दागिने लंपास..
पनवेल दि.२९ (वार्ताहर) : अज्ञात चोरटयाने नवीन पनवेल सेक्टर १८ मधील अष्टविनायक ओनर्स या इमारतीत भरदिवसा घरफोडी करुन तब्बल १० लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकिस आली आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
नवीन पनवेल सेक्टर १८ मधील अष्टविनायक ओनर्स या इमारतीत मंगेश पुरुषन (६३) हे पत्नी, दोन मुले व सुन यांच्यासोबत राहण्यास आहेत. मंगेश पुरुषन हे कामावर निघुन गेल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा व पत्नीहे देखील आपल्या कामावर निघुन गेले. यावेळी घरातच असलेला त्यांचा लहान मुलगा हा देखील सकाळी १०.३० वाजता कामानिमित्त वाशी येथे गेला. याचदरम्यान, अज्ञात चोरटयाने पुरुषन यांच्या घराचा कडीकोयंडा तोडुन त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरातील कपाटात असलेले वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे १० लाख रुपये किंमतीचे २४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. दरम्यान, मंगेश पुरुषन हे दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास कामावरुन आपल्या घरी आल्यानंतर घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरटया विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.