पनवेल शहर पोलिसांनी घालून दिली दोन वर्षीय मुलीची पालकांबरोबर भेट...
पनवेल शहर पोलिसांनी घालून दिली दोन वर्षीय मुलीची पालकांबरोबर भेट 
पनवेल दि २०, (संजय कदम) : पनवेल परिसरात घराबाहेर खेळत असताना एक दोन वर्षांची मुलगी वाट चुकल्याने पळस्पे ते टी पॉईंट या महामार्गावर आली होती. याबाबत पनवेल शहर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास  सुरुवात केली व अखेर या मुलीला शहर पोलिसांच्या तत्परतेने तिच्या वडिलांच्या स्वाधीन केले यावेळी त्यांनी पनवेल शहर पोलिसांचे मनापासून आभार मानले.
                  पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळस्पे ते टी पॉईंट या महामार्गावर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक दोन वर्षांची मुलगी सापडली. यावेळी पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने त्या मुलीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सादर मुलगी हि मुखबधिर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी  पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महाडेश्वर, महिला पोलीस कर्मचारी वैशाली कोकणे, विद्या भगत, पोलीस कर्मचारी झिने व बोरसे यांनी तिची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पसरवली तसेच तिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी अथक प्रयत्नानंतर धाकटा खांदा, पनवेल येथे हिचे नातेवाईक राहत असल्याचे समजले, व पथकाने तिच्या वडिलांचा शोध घेतला. फातिमा राईस शेख असे या लहान मुलीचे नाव आहे. यावेळी तिच्या वडिलांनी ती घराबाहेर खेळत असताना हरविली असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस स्टेशनमध्ये आल्याबरोबर वडिलांना त्याची मुलगी दिसल्याने मुलीला जवळ घेतले. या दरम्यान, मुलीला पाहुन त्याचे आनंदा अश्रू थांबता थांबत नव्हते. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पोलिसांनी मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. 


फोटो: आई वडिलांकडे मुलीला सुपूर्द करताना पनवेल शहर पोलिसांचे पथक
Comments