संगीत ऋषी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त 'स्मरण पलुस्करांचे' शास्त्रीय गायन..
 'स्मरण पलुस्करांचे' शास्त्रीय गायन...


पनवेल(प्रतिनिधी) भारतीय शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी आपले आयुष्य वेचणारे संगीत ऋषी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त पनवेल कल्चरल असोसिएशनच्या वतीने रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये सुप्रसिद्ध गायक रायगड भूषण पंडित उमेश चौधरी आणि गायिका मधुरा सोहनी यांच्या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  
         पनवेल कल्चरल असोसिएशन सभागृहात हा कार्यक्रम रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे. यावेळी संवादिनीवर नंदकुमार कर्वे तर तबल्यावर प्रसाद सुतार यांची गायकांना साथ असणार आहे.  पंडित विष्णू पलुस्करांनी ५ मे १९०१ रोजी लाहोर येथे "गंधर्व विद्यालयाची" स्थापना केली. पं. पलुस्करांचं आयुष्यभर बाळगलेलं स्वप्न त्या दिवशी पूर्ण झाले आणि वास्तविक ही घटना भारतीय संगीताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिखित होण्यासारखी झाली.  ह्या पूर्वी राजे रजवाड्यांच्या मदतीवरच अधारलेली अशी संगीत संस्था प्रस्थापित झालेली होती. गंधर्व महाविद्यालयाची स्थापना ही भारतात प्रथमच जनतेच्या मदतीवर चालणारी अशी संस्था निर्माण झाली. गंधर्व महाविद्यालयांतून तयार झालेल्या सुरुवातीच्या शिष्यांचे पूढे मोठे संगीतकार झाले, त्यातून संगीत शिकवणारे गुरूही निर्माण झाले. समाजांतील लोकांना ह्या विद्यालया-विषयी एक प्रकारचा आदर निर्माण झाला. महाविद्यालयांतून तयार झालेल्या संगीतकारांच्या बाबतीत बदलली. त्यांना समाजात आदरपूर्वक वागणूक मिळायला लागली. जो समाज पूर्वी संगीत कलाकारांना आदराने वागवित नसे, त्या समाजाची संगीतकारांकडे आदराने पाहण्याची वृत्ती ही एक क्रांतिकारी घटना गंधर्व महाविद्द्यालयाच्या स्थापनेमुळे निर्माण झाली त्याबद्दल भारतीय संगीत संस्था पलुस्कर यांची सदैव ऋणी रहाणार आहे. संगीताचा राज दरबारातून जनतेच्या घराघरात हा प्रवास घडविण्याचे काम करणारे संगीत ऋषी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या जयंतीनिमित्त हा  कार्यक्रम होणार असून या शास्त्रीय गायन कार्यक्रमाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे
Comments