भरत पाटील यांचे जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन..
पनवेल दि. १८ ( वार्ताहर ) : शासनाचे सर्व्हर अनेक दिवसापासून सतत बंद असल्यामुळे नियमानुसार ऑनलाईन बायोमॅट्रिक थंब घेऊन रेशनिंग दुकानात धान्य वाटप करता येत नाही.त्या अनुषंगाने दुकानदारांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे या संदर्भात शिवसेना पनवेल ग्रामीण उपजिल्हा प्रमुख भरत पाटील यांनी जिल्हाधिकारीना निवेदन देऊन संबंधित त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे .
शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, शासनाचे सर्वर बंद होत असल्यामुळे नियमानुसार ऑनलाईन बायोमॅट्रिक थंब घेऊन रेशनिंग दुकानात धान्य वाटप करता येत नाही.त्या अनुषंगाने दुकानदारांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे.
महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात महागाई मुळे जनता मेटाकुटीला आलेली आहे. मध्यमवर्गीय समाज सुद्धा रेशनिंग मधील धान्य घेण्यास इच्छुक आहे.परंतु वार्षिक उत्पन्नाची मर्यादा असल्यामुळे सार्वजनिक अन्न धान्य वितरण योजनेचा बट्याबोळ झालेला आहे. सद्या अनेक दिवसांपासून पनवेल तालुक्यातील व रायगड जिल्ह्यातील शासनाचे सर्व्हर काम करत नसल्यामुळे ई पॉज मशीनवरील बायोमॅट्रिक थंब पद्धत सुद्धा बंद आहे.शासनाचे सर्व्हर सतत बंद असल्यामुळे शासकीय नियमानुसार दुकानदारांना ऑनलाईन पद्धतीने बायोमॅट्रिक थंब घेऊन रेशनिंग दुकानात धान्य वाटप करता येत नाही. तसेच ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटप केले तर दुकानदारानं नियमित मिळणारे धान्य वाटपाचे कमिशन मिळत नाही.अशा परिस्थितीत " भिक नको पण कुत्रे आवर " अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
तसेच महाराष्ट्राचे दैवत श्री गणेशाचे आगमन तोंडावरती आलेले आहे.या सणासुदीच्या काळात सर्वसामान्य लाभार्थी रेशनकार्ड धारकांना शासनाच्या तांत्रिक त्रुटीमुळे धान्य व इतर जीवनाश्यक वस्तु उपलब्ध होत नसतील तर महाराष्ट्र राज्यासारख्या प्रगत राज्यात अशी परिस्थिती निर्माण होणे.हे महाराष्ट्रातील जनतेचे दुर्भाग्य आहे.
आपणांस विनंती करण्यात येते कि शासनाचे सर्वर अनेक दिवसांपासून सतत बंद असल्यामुळे ई पॉज मशीन व बायोमॅट्रिक थंब पद्धत बाबत सहानुभूती पूर्वक विचार विनिमय करुन सर्वसामान्य जनतेला रेशनिंग धान्यापासून वंचित ठेऊ नये.तसेच सर्व समाजातील तळागाळातील गरीब ,गरजू , लाभार्थी रेशनिंग कार्ड धारकांना रेशनिंग धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारांना धान्य वितरण कमिशन मिळणे अपरिहार्य आहे. अशी मागणी त्यांनी केली आहे .
फोटो - भरत पाटील