गाडीची काच फोडून १० लाख लंपास
पनवेल दि.०१(वार्ताहर): अज्ञात चोरट्याने नवीन पनवेल सेक्टर १ मध्ये रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कारची काच फोडून कारमध्ये चालकाच्या आसनाखाली ठेवलेली १० लाख रुपयांची रोख रक्कमेची पिशवी अवघ्या काही मिनिटात चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणातील तक्रारदार दिलीप पाटील (४५) हा पनवेल मधील पालेखुर्द येथे कुटुंबासह राहण्यास असून तो एका कंपनीत प्लांट ऑपरेटर म्हणून कामाला आहे. दिलीप पाटील याला जमिनीच्या व्यवहारासाठी पैसे हवे असल्याने तो गत २६ जुलै रोजी दुपारी तळोजा एमआयडीसीतील एका बँकेत गेला होता. बँकेतून त्याने १० लाख रुपयांची रोख रक्कम काढून ती पिशवीत भरून चालकाच्या आसनाखाली ठेवली होती. त्यानंतर तो नवीन पनवेल सेक्टर १ मधील बँकेत पैसे काढण्यासाठी गेला यावेळी दिलीप ने आपली कार नील हॊस्पिटल समोरील रस्त्याच्या बाजूला उभी केली होती. याचवेळी अज्ञात चोरट्याने संधी साधून त्याच्या कारची मागची काच फोडून १० लाखांची रोख रक्कम असलेली पिशवी चोरून नेली . कार जवळ आल्यानंतर काच फुटल्याचे तसेच कारमधील १० लाखांची रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.