चालकाचे कार वरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्य ; एक जखमी
पनवेल दि . १७ ( वार्ताहर ) : कळंबोली ब्रिजवर भरधाव कारवरील चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत झालेल्या अपघातात कारमधील दोघा जणांचा मृत्यू तर कारचालक जखमी झाल्याची घटना पुणे मुंबई लेन, एक्सप्रेस वेवर कळंबोली ब्रिजवर घडली. याप्रकरणी खांदेश्वर पोलिस ठाण्यात सदर अपघातास जबाबदार असलेल्या कारचालक जयंत फकिराजी डांगे (वय ४६ वर्षे), दिंडोशी गोरेगाव पूर्व, याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये शैलेद्र शुक्ला (३४), रा- दिंडोशी व शशिकुमार बैजनाथ प्रसाद (४५), राअंधेरी या दोघांचा समावेश आहे. दिंडोशी गोरेगाव पुर्व येथे राहणारा जयंत फकिराजी डांगे (४६), हा त्याची रेनॉल्ट कीव्हड कार क्रमांक (एम एच ४७ क्यु ०५७१) मधून त्याचे मित्र शैलेद्र शुक्ला, रा- दिंडोशी व शशिकुमार बैजनाथ प्रसाद (४१), रा- अंधेरी यांच्यासह गोवा येथे फिरण्यासाठी गेले होते तेथून ते परत येत असताना पुणे येथून जेवण करून पुणे-मुंबई एक्सप्रेस वे ने तिथेही सदर कारने घरी जात होते. यावेळी जयंत डांगे हा कार चालवित असतांना, पुणे मुंबई लेन, एक्सप्रेस वेवर कळंबोली ब्रिजवर डांगे याचे कारवरील नियंत्रण सुटून कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारच्या पुढील बाजुचा चक्काचूर होवून पुर्णपणे नुकसान झालेले होते. तसेच सदर कारमध्ये ड्रायव्हर सीटचे बाजुचे सीटवर एक इसम निपचीत अडकून पडलेला होता. घटनेची दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी अपघातग्रस्त कार मधील अडकलेल्या इसमास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सदरची कार पुर्णपणे दबलेल्या स्थितीत असल्याने शशिकुमार बैजनाथ प्रसाद (४५), यास बाहेर काढता आले नाही. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांनी फायर ब्रिगेडला पाचारण करून त्यांच्या मदतीने त्यास कार बाहेर काढून अम्ब्युलन्स मार्फत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. दरम्यान सदर कारमधील चालक डांगे यास कुणीतरी उपचारासाठी एमजीएम हॉस्पीटल, कामोठे, येथे दाखल केले होते. तर अपघातग्रस्त कार मधील तिसरा इसम शैलेन्द्र शुक्ला (वय- ३४ वर्षे) यास कोणीतरी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे दाखल केले असता, त्याला देखील तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एमजीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कारचालक डांगे याचा जबाब नोंदवून त्याने दिलेल्या माहितीवरून तसेच सदर अपघातातील कारची स्थिती व घटनास्थळावरील परिस्थिती पाहता सदस्या अपघात हा रेनॉल्ट क्रीड कार चालक डांगे याचे वाहनावरील ताबा सुटून झाल्याने तो सदर अपघातात स्वतःचे दुखापतीस तसेच शैलेद्र शुक्ला व शशिकुमार बैजनाथ प्रसाद (४५ वर्षे) रा- अंधेरी या दोघा मित्रांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.