रोटरी कर्णबधीर शाळेत जागतिक कर्णबधीर दिन साजरा
पनवेल दि. ३० (वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रोटरी कर्णबधीर मुलांच्या विशेष शाळेत जागतिक कर्णबधीर दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून शाळेतील मुलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी मुलांना रोटरी सभागृहात कार्टून फिल्म दाखविण्यात आली. मुलांनी या फिल्मचा मनसोक्त आनंद लुटला. दुपारी मुलांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
दुपारच्या सत्रात मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात लहान प्रवर्गासाठी बटाटा शर्यत, पायाच्या बोटाने मणी टोपलीत टाकणे, तर मोठ्या प्रवर्गासाठी अंतरावरुन बॉल बादलीत टाकणे, फुगा दोन्ही पायांत पकडून घसरणे, बॉटल उभी करणे, इ. खेळ घेतले गेले. यात मुलांनी बक्षिसे पटकावली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संस्थेचे चेअरमन अरविंद सावळेकर आणि संस्थेचे सचिव प्रमोद वालेकर यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या वेळी शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका शैला बंदसोडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांकेतिक भाषेत रुपांतर शाळेच्या विशेष शिक्षिका कुंदा शेवाळे यांनी केले तर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशेष शिक्षिका अरुंधती बंदसोडे यांनी केले.
फोटो - रोटरी कर्णबधीर शाळेत जागतिक कर्णबधीर दिन साजरा