गणराया समोर मंगळा गौरीचा जागर रोडपालीतील वेरोना सोसायटीत नाच ग घुमा चा आवाज घुमला..
नाच ग घुमा चा आवाज घुमला..
दोन वर्षानंतर गणेशोत्सवात उत्सवाचे स्वरूप
पनवेल दि. ०४ ( वार्ताहर ) : कोरोना वैश्विक संकटामुळे गणेशोत्सवावर दोन वर्ष एक प्रकारे निर्बंध लादले गेले होते. मात्र बाप्पाच्या कृपेने ही महामारी आटोक्यात आली आहे. त्यामुळे रोडपाली येथील वेरोना को-ऑपरेटिव्ह  हाऊसिंग सोसायटी मध्ये गणरायांचे आगमन झाले आहे. या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले असून. गणपती बाप्पांसमोर मंगळागौरीचा जागर ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पनवेल परिसरामध्ये नागरीकरण झाले असले तरी पारंपरिक सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मंगळागौरचे अनेक ठिकाणी आयोजन केले जाते. 
                 नोकरी-व्यवसाय करणाऱ्या भगिनी आपले कार्यालय आणि कुटुंब सांभाळा मध्ये व्यस्त असतात. त्याचबरोबर गृहिणीसुद्धा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असतात. या सर्व गोष्टी करीत असताना आपल्या परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मनामध्ये कमालीची उत्सुकता असते. त्याच नुसार रोडपाली सेक्टर 10 येथील वेरोना को-ऑपरेटिव्ह  हाऊसिंग सोसायटी मध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळाचे हे पाचवे वर्ष असून यावेळी गणरायाचे उत्साहात आणि जोरदार स्वागत करण्यात आले. बाप्पांची अत्यंत मनमोहक अशा मूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्याचबरोबर उत्तम अशी सजावट सुद्धा करण्यात आले आहे. गणेशोत्सवानिमित्त सोसायटीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून गणपती बाप्पा समोर मंगळागौरीचा जागर करण्यात आला. पारंपारिक नृत्य अविष्कार सादर करत महिलांनी उपस्थितांना जिंकून घेतले. त्याचबरोबर त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना यानिमित्ताने वाव मिळाला. या कार्यक्रमामध्ये स्त्रीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.ग्रामीण भागांत प्रसिद्ध असणाऱ्या मंगळागौर कार्यक्रमाचे प्रथमच कळंबोली मध्ये आयोजन करण्यात आले होते. हा पारंपारिक नृत्याविष्कार पाण्यासाठी आजूबाजूच्या सोसायटीमधील महिला भगिनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नऊवारी साडी परिधान करून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे यावेळी सावित्रीच्या लेकींनी दर्शन घडवले.तसेच लहान मुलांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री शक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम प्रमुख उपस्थित होत्या. वेरोना सोसायटीचे सचिव रोहन गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सामाजिक कार्यकर्त्या विजया कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सूत्रसंचालन दीपक गोंधळी यांनी केले. विभा गायकवाड व आर्या कदम  यांनी मंगळागौर बद्दल माहिती सांगितली.

चौकट

महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचे धडे!

सामाजिक कार्यकर्त्या विजया कदम  स्त्री शक्ती फाउंडेशन च्या माध्यमातून महिलांसाठी विशेष काम करीत आहेत. सावित्रीच्या लेकींना स्वयंमसिद्धा चे धडे देण्यापासून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याच्या अनुषंगाने त्यांनी काम केले आहे. गणेशोत्सवानिमित्त वेरोना सोसायटीमध्ये कदम यांनी उपस्थित स्त्रियांना महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाचे धडे दिले. स्वंरक्षणासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर महिला विषयक कायद्याबाबत माहिती देण्यात आली.


फोटो - मंगळा गौरीचा जागर
Comments