आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॉर्पोरेट क्लिनिक रुग्णसेवेत रुजू..

कॉर्पोरेट टुरिझम देणार वैद्यकीय क्षेत्राला कलाटणी
पनवेल / वार्ताहर : - युनायटेड कॉर्पोरेट कम्युनिटी ऑफ नेशन्स या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेच्या वतीने कॉर्पोरेट क्लिनिक आणि कॉर्पोरेट टुरिझम या अभिनव संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. बेलापूर रेल्वे स्टेशन कमर्शियल कॉम्प्लेक्स मधील आलिशान कार्यालयात शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सदर सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला नगरसेवक मिथुन पाटील, मिंडा कॉर्पोरेशनचे रिजनल हेड कौशीक, नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 सायबर क्राईम चे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल माने, संस्थेचे सह संस्थापक तथा अध्यक्ष वैभव सोनटक्के, सह संस्थापक तथा उपाध्यक्ष डॉक्टर मेहुल कुमार दवे आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर दिनेश भट,डॉ विशाल ढोक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.अमेरिकेतील या क्षेत्रामधील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या सुझन हंटर या संस्थेच्या सह संस्थापिका तथा ग्लोबल हेड आहेत.
       या संकल्पनेबाबत प्रसिद्धी माध्यमांना अवगत करून देताना संस्थापक अध्यक्ष वैभव सोनटक्के म्हणाले की वैद्यकीय पर्यटन ही काळाची गरज बनली आहे. भारतामध्ये उपलब्ध असणारे वैद्यकीय क्षेत्रातील नैपुण्य प्राप्त डॉक्टर्स, अत्याधुनिक सेवा देणारी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल्स, हाय टेक परीक्षण सुविधा हे सारे जगभरातील रुग्णांना आकर्षित करत आहे. त्यांना योग्य ती दिशा दाखवून व्याधीमुक्तीचे ध्येय्य प्राप्त केले तर वैद्यकीय क्षेत्र अमुलाग्र पद्धतीने बदलून जाईल. तसेच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी मंडळी आपल्या कामात आकंठ बुडून गेलेली असतात. त्यांच्या शारीरिक व्याधी चिकित्सा तसेच नित्याच्या वैद्यकीय तपासण्या त्यांना कामाच्या ठिकाणीच उपलब्ध करून दिल्यास सुदृढ समाजव्यवस्था निर्मितीस हातभार लागेल. या उदात्त हेतूने आमच्या संस्थेने या अभिनव उपक्रमास प्रारंभ केला आहे. कॉर्पोरेट सेक्टर मधील कंपन्या त्यांचे कर्मचारी यांना याचा अत्यंत लाभ होईल.
      आयोजकांच्या वतीने सिटीबेल वृत्त समूहाचे संपादक मंदार दोंदे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर एन्जॉय मार्केट सिटी मॉल चे संचालक सत्येंद्र सिंग, सिटी बेल वृत्त समूहाचे समूह संपादक विवेक पाटील यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.
या कार्यक्रमाला डॉक्टर दिव्या भंडारकर, डॉक्टर अमित साष्टे, डॉक्टर पुनम साष्टे, डॉक्टर अजय, डॉक्टर नंदगोपाल आचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments