चीन मधील कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून केली ५२ लाखांची फसवणूक..
चीन मधील कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून केली ५२ लाखांची फसवणूक

पनवेल दि.१६ (वार्ताहर) : चीन मधील कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवुन एका सायबर चोरट्याने तळोजा एमआयडीसीतील फ्लुरो इंजिनियरींग प्रा. लि. या कंपनीला बनावट ईमेलद्वारे संपर्क साधुन सदर कंपनीला फॅक्टरी अॅटमेशनसाठी लागणारे पार्टस पाठविण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडुन तब्बल ५२ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात सायबर चोरट्याविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणात फसवणुक झालेली फ्लुरो इंजिनियरींग प्रा.लि.नावाची कंपनी तळोजा एमआयडीसीत असून या कंपनीकडुन फॅक्टरी ऑटोमेशन मशीनसाठी लागणारे पार्टस परदेशातुन मागविण्यात येऊन त्या पार्टसची देशामध्ये विक्री केली जाते. फ्लोरो इंजिनीयरींग कंपनी, चीन मधील झियान सिल्वरस्टोन मशिनरी या कंपनीकडुन मागील १० वर्षापासून पॅक्टरी ऑटोमेशन मशीनच्या पार्टची मागवित आहे. गत डिसेंबर २०२१ मध्ये देखील फ्लोरो इंजिनियरींग कंपनीने चीनमधील झियान सिल्वरस्टोन मशिनरी को लिमी या कंपनीला नेहमीप्रमाणे ईमेल पाठवुन फॅक्टरी ऑटोमेशनसाठी लागणारे एकुण ३२९०४ पार्टसची मागणी केली होती. याचदरम्यान अज्ञात सायबर चोरट्याने झियान सिल्वरस्टोन मशिनरी या कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून झियान सिल्वरस्टोन मशिनरी या कंपनीच्या ईमेलसारखा हुबेहुब बनावट ईमेल आयडी तयार करुन त्याद्वारे फ्लोरो इंजिनीयरींग कंपनीला संपर्क साधला. तसेच झियान सिल्वरस्टोन मशिनरी ही कंपनी बंद झाल्याचे व तीच कंपनी एक्सी जिओंगवे ट्रेडींग को.लि. या नावाने सुरु झाल्याची खोटी माहिती दिली. तसेच त्यांच्या कंपनीने झिझँग चाऊझाऊ कमर्शियल या बँकेत नवीन खाते सुरु केल्याची माहिती देऊन त्या बँक खात्यात व्यवहाराचे ५२ लाख रुपये (६७१३८.८० युएसडी) पाठविण्याबाबत ईमेलद्वारे सांगण्यात आले. सायबर चोरट्याकडुन देण्यात आलेल्या माहितीवर विश्वास ठेवून फ्लोरो इंजिनियरींग कंपनीने सायबर चोरट्याने दिलेल्या बँक खात्यावर गत जुन महिन्यात ५२ लाख रुपये पाठवुन दिले. काही दिवसानंतर चीनमधील झियान सिल्वरस्टोन मशिनरी या कंपनीने फ्लोरो इंजिनियरींग कंपनीला फोनवरून संपर्क साधत, त्यांनी दिलेल्या मशीनच्या पार्टसचे पेमेंट अद्याप कंपनीला मिळाले नसल्याचे सांगितले. त्यानंतर फ्लुरो इंजिनियरींग कंपनीने आपल्या व्यवहाराची तपासणी केली असता, त्यांच्या कंपनीची फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीच्या संचालकांनी तळोजा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
Comments