आता उत्पन्नाच्या दाखल्यासाठी रेशन कार्डची गरज नाही; शिवसेना शिंदे गटाच्या मागणीला यश
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : उत्पन्नाच्या दाखल्यासाठी रेशन कार्ड बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, रुग्णांसाठी वैद्यकीय योजना, तसेच कर्ज मंजुरीसाठी अडथळे निर्माण होत होते. मात्र, शिवसेना शिंदे गटाकडून याबाबतचे एक निवेदन तहसीलदारांना देण्यात आल्यानंतर हा अडथळा दूर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
तहसीलदार कार्यालयाकडून वेगवेगळ्या प्रकारचे दाखले दिले जातात. त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकरता तसेच शिष्यवृत्तीसाठी सुद्धा उत्पन्नाच्या दाखल्याची गरज आहे. पनवेल तहसील कार्यालयाकडे यासाठी अनेक पालकांनी अर्ज केले आहेत. मात्र, नव्याने पदभार घेतलेल्या नायब तहसीलदारांकडे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी रेशन कार्ड बंधनकारक केले होते. त्यामुळे अनेकांची शिधापत्रिका ही मूळ गावी असल्याने तर काहीजण मुंबई येथून पनवेलला स्थलांतरित झाल्यामुळे मुंबईतच रेशन कार्ड असल्याने अडचणींचा सामना करावा लागत होता. अशातच प्रवेशाची मुदत संपत आली असतानासुद्धा संबंधित विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला दिला जात नसल्याने याबाबत लाभार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता. उत्पन्नाच्या दाखल्यासाठी रेशन कार्ड बंधनकारक केल्याने विविध अडचणी येत होत्या. यासंदर्भात माजी नगरसेवक शिवाजी थोरवे यांच्याकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे, शिवाजी थोरवे यांच्या शिष्टमंडळाने पनवेल तहसिलदारांना निवेदन सादर केले होते.
फोटो : शिवसेना शिंदे गटाकडून नायब तहसीलदारांना निवेदन देताना पदाधिकारी