बिल्डरच्या चालक-मालक पिता-पुत्रांविरोधात फसवणुकीसह अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल..
बिल्डरच्या चालक-मालक पिता-पुत्रांविरोधात फसवणुकीसह अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल


पनवेल दि. १२ ( वार्ताहर ) :  तब्बल २० लाख रुपये देऊन खारघर थील नवकार रेसिडेन्सी इमारतीतील फ्लॅटची नोंदणी करणाऱ्या एका सफाई कामगाराला बिल्डरने गेल्या सात वर्षांमध्ये फ्लॅट न दिल्याने सफाई कामगाराने आपली रक्कम परत मागितली असता, बिल्डर पिता-पुत्रांनी त्याला उलट जातीवाचक शिवीगाळ करून त्याचा अपमान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे खारघर पोलिसांनी नवकार बिल्डरच्या चालक-मालक पिता-पुत्रांविरोधात फसवणुकीसह अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
                      मुंब्रा येथील ठाकुरपाडा भागात राहणारे तक्रारदार अविनाश रहाटे (२८) मुंबई महापालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. अविनाश यांना २०१५ मध्ये खारघर येथे घर घ्यायचे असल्याने, त्याने आपल्या मित्राच्या मध्यस्थीने नवकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चालक-मालक सोहन जैन व त्यांचा मुलगा पियूष जैन यांची भेट घेतली होती. जैन यांनी त्यांच्या नवकार रेसिडेन्सी या इमारतीतील ६१५ चौरस फुटांचा वन बीएचके फ्लॅट ३३ लाख ८५ हजार रुपयांमध्ये विकत देण्याची तयारी दर्शवली. अविनाश यांनी
प्रथम नऊ लाख ४५ हजार रुपये व त्यानंतर फेब्रुवारी २०१५ ते जून २०१६ या कालावधीत १० लाख ५५ हजार रुपये अशी एकूण २० लाखांची रक्कम बिल्डरला दिली होती. मात्र २०१६ मध्ये सिडकोने नवकार रेसिडेन्सी इमारतीवर कारवाई करून ती पाडून टाकल्याने, जैन यांनी करंजाडे आणि वडघर येथे बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतीत घर देण्याचे कबूल केले होते. मात्र मागील सात वर्षांत त्यांनी फ्लॅट दिला नाही. त्यामुळे ऑगस्ट २०२१ मध्ये अविनाश यांनी आपले पैसे परत मागितले असता, जैन यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर जैन पिता-पुत्राने फेब्रुवारी २०२२ मध्ये फ्लॅटच्या कराराचा ड्राफ्ट तयार करून फ्लॅटची उर्वरित ११ लाख रक्कम देण्यास सांगितले. मात्र अविनाश यांनी नकार देऊन, आपली रक्कम परत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे पियूष जैन याने अविनाश यांना गेल्या फेब्रुवारीत खारघर येथे भेटण्यास बोलावले. यावेळी पियूष याने भररस्त्यात अविनाश यांना जातीवाचक शिवीगाळ केली. त्यामुळे अविनाश रहाटे यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Comments