मुले चोरण्यासाठी आल्याचे समजुन एका रिक्षा चालकासह व दोन तरुणींना बेदम मारहाण ...
मुले चोरण्यासाठी आल्याचे समजुन एका रिक्षा चालकासह  व दोन तरुणींना बेदम मारहाण 


पनवेल दि. ०६ ( वार्ताहर ) : मुले चोरण्यासाठी आल्याचे समजुन तळोजा गावात राहणाऱ्या पाच ते सहा व्यक्तींनी एका रिक्षा चालकाला व दोन तरुणींना बेदम मारहाण केल्याची घटना तळोजा येथे घडली. या मारहाणीत रिक्षा चालकाच्या रिक्षाची देखील तोडफोड केली आहे. या मारहाणीत रिक्षा चालक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर तळोजा पोलिसांनी पाच ते सहा अज्ञात व्यक्तीविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. 
                      .या घटनेत जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव महम्मद गुलमोहम्मद शकील अन्सारी (२४) असे असून तो शिळफाटा येथील झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासह राहण्यास आहे. महम्मद अन्सारी हा भाडय़ाने रिक्षा चालवुन आपल्य कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. मोहम्मद अन्सारी हा प्रवासी घेऊन कळंबोली येथे गेला होता. त्यानंतर तो  पुन्हा शिळफाटा येथे प्रवासी घेऊन जाण्यास निघाला होता. तळोजा गाव येथे दोन महिला प्रवाशांना सोडल्यानंतर महम्मद अन्सारी याला शिळफाटा येथे राहणाऱ्या त्याच्या ओळखीतील दोन तरुणी निदर्शनास आल्या. त्यामुळे महम्मद अन्सारी हा त्या तरुणींकडे विचारपुस करत असतानाच त्यांच्या पाठीमागून आलेल्या चार ते पाच व्यक्तींनी सदर तरुणी या मुले चोरण्यासाठी आल्याचे सांगत त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रिक्षा चालक महम्मद अन्सारी याने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता, मारहाण करणाऱ्या व्यक्तींनी तो देखील मुले चोरण्यासाठी आल्याचे सांगत त्याला देखील लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून त्या भागात असलेल्या इतर नागरिकांनी महम्मद अन्सारी हा मुले चोरणाऱ्या टोळीतील सदस्य असल्याचे सांगत त्याला मारहाण करत त्याच्या रिक्षाची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच तळोजा पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन रिक्षा चालक महम्मद अन्सारी याची मारहाण करणाऱ्या लोकांच्या तावडीतून सोडवणुक केली. या मारहाणीत रिक्षा चालक जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात पाठवुन दिले..
Comments