पनवेल रेल्वे अपघातप्रकरणी अभिजीत पाटील यांची रेल्वेमंत्री व मुख्यमंत्र्यासह वरिष्ठ स्तरावर कारवाईची मागणी....
ठेकेदार आणि रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा...


पनवेल: प्रतिनिधी
          नवीन पनवेलमधील पंचशील नगर येथे रेल्वेच्या फलाट रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यात मागील ४ वर्षात चार निष्पाप बालकांचा बळी गेला आहे. २०१८ पासून रेल्वेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या या खड्ड्यात अनेक महिन्यांपासून पाणी साचलेले आहे. त्याच परिसरात राहणारी ४ वर्षीय चिमुकली माही सिद्धेश वाघमारे ही तीन दिवसांपूर्वी खेळता खेळता त्या खड्ड्यात पडली. त्यातच तिचा बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने पनवेलसह परिसरात खळबळ माजली आहे. या धर्तीवर ठेकेदार आणि रेल्वे प्रशासनाने देखरेखीसाठी नियुक्त केलेले अधिकारी तसेच या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मध्य रेल्वे, भारत सरकार- सल्लागार सदस्य तथा पनवेल प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी वरिष्ठ स्तरावर केली आहे.
           याबाबत अभिजीत पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रेल्वे पोलीस आयुक्त, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह इतर संबंधित विभागांकडे पत्राद्वारे कारवाईची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी म्हंटले आहे की, रेल्वे कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पुन्हा एकदा अजुन एका निष्पाप जिवाचा नाहक बळी गेल्याची घटना घडली आहे. ठेकेदार आणि रेल्वे प्रशासनाने देखरेखीसाठी नियुक्त केलेल्या अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे.
         पनवेल रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम २०१८ पासून सुरू आहे. त्यासाठी जागोजागी मोठे खड्डे करण्यात आले आहेत व त्यामध्ये पाणी साठुन राहते. त्याठिकाणी सुरक्षेची कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी त्याच परिसरात राहणारी माही सिध्देश वाघमारे ही ४ वर्षाची मुलगी खड्ड्यात पडुन मरण पावली आहे. अशा घटना वारंवार घडत असुन सुध्दा प्रशासन या गोष्टीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याचे निर्दशनात येत आहे. तसेच यापुर्वीही २०१८ पासुन या खड्ड्यात पडून अनेक निष्पाप जिवांचा बळी गेला आहे. रमेश भोसले (वय वर्ष-१३ ) रोहीत भोसले (वय वर्ष-१०) आणि प्रतिक्षा भोसले (वय वर्ष-८) यांना देखील अशाचप्रकारे आपला जिव गमवावा लागला आहे.
           यावरून असे दिसुन येते की, ठेकेदार आणि रेल्वे प्रशासनाने देखरेखीसाठी नियुक्त केलेले अधिकारी हे कोणत्याच प्रकारच्या सुरक्षिततेची व्यवस्था करीत नाहीत. परिणामी त्यांना नागरिकांच्या जिवाची तसेच विशेषतः लहान मुलांची अजिबात पर्वा नसल्याचे दिसून येते. या घटनांचा पाठपुरावा करून त्याचा तपास करून व दोषींवर योग्य ती कारवाई केली जावी. प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता गार्भीयांने या विषयावर लक्ष दिले पाहिजे. तसेच ठेकेदार आणि रेल्वे प्रशासनाने देखरेखीसाठी नियुक्त केलेले अधिकारी यांचावर गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मध्य रेल्वे, भारत सरकार- सल्लागार सदस्य तथा पनवेल प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केली आहे.
Comments