को.ए.सो.इंदुबाई वाजेकर शाळेचा पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन संपन्न...

   
माजी विद्यार्थी सागर म्हात्रे इंडियन आयडल मराठीचा विजेता याची उपस्थिती ....
 
पनवेल / प्रतिनिधी  : -  को. ए. सो. इंदुबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेचे पारितोषिक वितरण समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन     दि. 23 डिसेंबर 2022 रोजी संपन्न झाले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा समितीचे चेअरमन व्ही. सी. म्हात्रे यांनी भूषविले. तर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आणि शाळा समितीच्या सदस्या श्रीमती अंजली उर्हेकर तसेच इंडियन आयडल मराठीचा विजेता सागर म्हात्रे होते. शाळा समितीचे सदस्य सुभाष देशपांडे, नंदकुमार वाजेकर, शाळेचे माजी सभापती ॲड. प्रमोद ठाकूर, रोटरी क्लबचे सदस्य, विद्या संकुलातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. 
       
या कार्यक्रमात शैक्षणिक वर्ष 2019-20, 2020-21, 2021-22 या वर्षातील दहावीतील गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, पालक यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेतील सांघिक बक्षिसांचे वितरण करण्यात आले. शाळेचे हस्तलिखित 'ब्लॉसम' चे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. 
         
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मनीषा पाटील यांनी केले.तर शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानसी कोकीळ यांनी केले. 
     ॲड. प्रमोद ठाकूर यांनी आपल्या भाषणात शाळेच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आलेख मांडला. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका उर्हेकर  यांनी शाळेच्या प्रगतीमध्ये शाळेचे चेअरमन यांचा मोलाचा वाटा आहे असे सांगितले. आपल्या भाषणात शाळा समितीचे चेअरमन व्ही. सी.म्हात्रे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपली तत्वे, मूल्ये यांची कास धरून चालावे असे सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे 'सागर म्हात्रे' यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
      सायंकाळी शाळेच्या प्रांगणात नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन साजरे झाले. यामध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी या विषयावर नाटिका, छत्रपती शिवाजी महाराज, अवयव दान, मोबाईलचे इफेक्ट ,कोरोना योद्धांना मानवंदना, महाराष्ट्राची लोकधारा, विविधतेत एकता, भारतातील विविध सण समारंभ अशा वैविध्यपूर्ण विषयांवर नृत्य सादर केले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो असे मत पाहुण्यांनी व्यक्त केले. 
कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments