कॉपर कॉईल चोरणाऱ्या सराईत दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड...
कॉपर कॉईल चोरणाऱ्या सराईत दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड...

पनवेल दि.३१ (संजय कदम) : पनवेलमधील विविध परिसरातून इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्म मधिल कॉपर काईल व इन्सुलेशन चोरणाऱ्या सराईत दुकलीला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून पोलिसांनी लाखोंचा माल हस्तगत केला.
पनवेलमधील विविध इलेक्ट्रीक ट्रान्सफार्मर मधून लाखो रुपये किमतीचे कॉपर काईल चोरी गेल्याच्या घटनेत वाढ होत होती. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अभयसिंह शिंदे, पोहवा रविंद्र राऊत, पोहवा परेश म्हात्रे, पोहवा महेंद्र वायकर, पोना रविंद्र पारधी, पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने गुप्त माहितीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अबुलआस वारीस अली समानी (वय ३४) आणि मुनावर सफ़ेदद्दिन खान (वय ३४) यांना ताब्यात घेतले. तपासात त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पुष्पक नोड तसेच कुंडेवहाळ येथे स्टोन क्रशर करिता बसवलेल्या इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर मधून त्याचप्रमाणे साईनगर येथील महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मर मधून लाखो रुपये किमतीचे कॉपर कॉईल, कॉपर वायंडींग व इन्शुलेशनची चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या सराईत दुकलीच्या अटकेने पनवेल परिसरातील आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Comments