दुहेरी करातून पनवेलकरांची सुटका ; महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार...
सोमण यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार...
पनवेल / वर्ताहर  : -  
नुकत्याच राज्य शासनाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपैकी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल महानगरपालिकेतील सिडको हद्दीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भरावा लागणारा दुहेरी टॅक्स रद्द केला आहे. महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासून महानगरपालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स व सिडकोचा सर्विस टॅक्स असे दोन प्रकारचे कर भरावे लागत होते. अशा परिस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना चे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी यापूर्वी एकनाथ शिंदे, नगर विकास मंत्री असताना तथा मुख्यमंत्री झाल्यावर देखील पत्रव्यवहार करून दुहेरी टॅक्स बंद करण्याची विनंती केली होती. नागपूर येथे झालेल्या या वेळेच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी पनवेलगरांच्या वतीने सोमण यांनी केली. त्याचबरोबर शिवसेनेचे महानगर संघटक मंगेश रानवडे यांनी देखील खारघर तळोजा वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांकडे हे गाऱ्हाणे घातले. याव्यतिरिक्त भारतीय जनता पार्टी, विविध स्थानिक संस्था असोसिएशन्स यांनी पूर्वलक्षी प्रभावापासून महापालिका वसूल करत असलेला टॅक्स व सिडकोचा टॅक्स याबद्दल नाराजी व्यक्त करत वेळोवेळी शासनाकडे दुहेरी टॅक्स रद्द करण्याची व पूर्वलक्षी प्रभावाने टॅक्स घेणे बंद करण्याची मागणी केली होती. याबाबत अनेक याचीका ही कोर्टात प्रलंबित आहेत. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाडीने निर्णय घेत नोव्हेंबर 2022 पासून सिडकोचा हा सेवा कर पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना लागू होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने करविषयक लढ्यात पनवेलकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याबाबत बाळासाहेबांची शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी मुख्यमंत्री साहेबांचे आभार व्यक्त केले.
Comments