हसा दिलखुलास कार्यक्रमाने जिंकली ठाणेकरांनी मने...

ठाण्याच्या सिकेपी सोशल क्लब ने आयोजित केला होता कार्यक्रम..
रसिकहो प्रस्तुती च्या काव्य मैफिलीवर हास्यदेव प्रसन्न..

ठाणे / प्रतिनिधी : -  मराठी राजभाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला ठाण्याच्या सीकेपी हॉलमध्ये पनवेलची रसिकहो प्रस्तुती आणि सीकेपी सोशल क्लब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने हास्य कवितांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. हसा दिलखुलास असे शीर्षक घेत पाच कवींच्या कवितांनी हास्य वर्षावात ठाणेकरांना चिंब भिजवले.ठाण्यातील रसिक प्रेक्षकांचा या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
        चंद्रसेनिय कायस्थ प्रभू सोशल क्लब, ठाणे यांनी मराठी राजभाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला हास्य कवितांच्या मैफिलीचे आयोजन केले होते. यामध्ये पनवेल ची रसिकहो प्रस्तुती या संस्थेचे आशिष चौबळ,नाना फडणीस,मंदार दोंदे,संपदा देशपांडे आणि योगेश राजे यांनी स्वरचित हास्य कविता सादर केल्या. या काव्य सादरीकरणात स्मित हास्य ते गडगडाटी हास्यकल्लोळ उपस्थितांनी अनुभवला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य आयोजक ज्योती टिपणीस यांनी प्रास्ताविक सादर केले. ज्यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी राजभाषा गौरव दिन साजरा केला जातो असे विष्णू वामन शिरवाडकर आणि 26 फेब्रुवारी रोजी देह त्याग करणारे तात्याराव अर्थात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त या दिग्गज द्वईंना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्याध्यक्ष अतुल फणसे यांनी आपल्या मनोगतातून चांद्रसेनिय कायस्थ प्रभू सोशल क्लब करत असलेल्या उपक्रमांबाबत उपस्थितांना अवगत केले, तसेच पूर्वसंध्येला कार्यक्रम आयोजित करण्यापाठीमागची भूमिका विषद केली.तत्पूर्वी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने सोहळ्यास प्रारंभ झाला.
       ज्योती पानसरे यांच्या खुमासदार शैलीतील निवेदनाने कार्यक्रमाला वैशिष्ट्यपूर्ण कोंदण लाभले. कसलेल्या सलामी फलंदाजाच्या थाटात मंदार दोंदे यांनी दळिद्री बॉलीवूड ही कविता सादर करून दणक्यात सुरुवात केली. संपदा देशपांडे यांच्या जीव माझा गुंतला या गृहिणींच्या अंतरपटलात शिरून त्यांना खुदुखुदू हसायला लावणाऱ्या कवितेने धम्माल उडविली. विजय फडणीस उर्फ नाना यांच्या विस्की बियर आणि वाईन या कवितेने उपस्थित रसिकांना हास्याची झिंग चढली. अलवार कवितांच्या विश्वात सहज घेऊन जाण्याची खुबी असणारे आशिष चौबळ यांच्या नजरानजर कवितेने हास्य कारंज्या फुलविल्या. त्यानंतर विजय फडणीस यांची हुकलेली 9-12 ची लोकल ही कविता रसिका प्रेक्षकांना हास्याच्या प्लॅटफॉर्मवर घेऊन गेली. योगेश राजे यांनी सादर केलेल्या ती आणि शी या कवितेतील ट्विस्टने प्रेक्षकांनी हास्य गडगडाट अनुभवला. मंदार दोंदे यांच्या सस्पेन्स भरी प्रमोशन या कवितेने हास्य तुषार उडविले. आशिष   चौबळ यांच्या मुठीतला मी कवितेने हसवता हसवता रसिक प्रेक्षकांच्या अंत:करणाला हात घातला. मंदार दोंदे यांच्या त्यांचं मन मोडवत नाही! या कवितेने हास्याचे प्याले एकमेकांवर आदळत रसिक प्रेक्षकांना "चिअर्स" करायला लावले.
       आशिष चौबळ यांच्या चाळीतील आठवणी आणि योगेश राजे यांच्या ठसकेबाज चालीतील सर्दी या कवितांनी रसिक श्रोत्यांना हास्याच्या सर्वोच्च बिंदूवर नेऊन ठेवले. नाना फडणीस यांच्या डुलकी कवितेने लज्जत आणली. संपदा देशपांडे हिने सादर केलेली अजून यौवनात मी! आणि योगेश राजे यांनी सादर केलेली पन्नाशीचा माणूस म्हातारा! या कवितांनी रसिक श्रोत्यांना खदखदून हसवले. संपदा हिने सादर केलेल्या टक्कल कवितेने खुसखुशीत हशा पिकविला,तर टक्कल पडलेल्या व्यक्तींना अलगद गोंजारत हिरो करण्याच्या सांगतेने उपस्थितांची वाहवा मिळवली.
         अखेरच्या चरणात आशिष यांची लग्नगाठ मुरकुंडी वळवून गेली,योगेश यांच्या फालुदा या कवितेने हास्याची थंडगार अनुभूती दिली,तर मंदार यांच्या मी नि:शब्द होतो! या चावट कवितेने हास्यकल्लोळ घातला.
      रसिकहो प्रस्तुती या संस्थेच्या सदस्या सानिका पत्की यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती. मंदार दोंदे यांनी रसिकहो प्रस्तुती... या संस्थेच्या काव्य चळवळी बाबत उपस्थितांना अवगत केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी ज्योती टिपणीस आणि अतुल फणसे यांच्या संपूर्ण टीमने अथक परिश्रम घेतले होते.आशिष चौबळ यांनी प्रमुख आयोजक, सीकेपी सोशल क्लब आणि उपस्थित श्रोते यांचे आभार मानल्या नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments