वारंवार वीज पुरवठा खंडित : करंजाडे नागरिकांची महावितरण कार्यालयावर धडक ..
करंजाडे वसाहतीत विजेचा खेळखंडोबा...

पनवेल / वर्ताहर : - वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने करंजाडे वसाहतीतील नागरिकांना उन्हाच्या ताडाख्याचा विद्युत पुरवठ्याशिवाय मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे विजेच्या लपंडावामुळे काही विध्यार्थ्याना ऑनलाईन परीक्षेला मुकावे लागले असल्याने पालकांनी व वसाहतीतील नागरिकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी नागरिकांनी अखेर महावितरण कार्यालयावर रविवारी रात्री धडक दिली. यावेळी त्वरित वीज सुरळीत झाली.

करंजाडे वसाहतीत नागरीकरण वाढले आहे. या वाढत्या नागरीकरणाबरोबरच रहिवाशी मोठ्या संख्येने या वसाहतीत राहण्यासाठी आलेले आहेत. महावितरण कार्यालयाकडून या वसाहतीला वीज पुरवठा केलेला आहे. मात्र वीजपुरवठ्यावर भार येत आहे. त्याचबरोबर काही विध्यार्थी घरून ऑनलाईन अभ्यास करीत आहेत. मात्र करंजाडे वसाहती मध्ये सेक्टर 3, 4 तसेच इतर सेक्टरमध्येही रात्रीच्यावेळी गेल्या काही दिवसांपासून विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. वारंवार वीज खंडित झाल्याने काहींच्या घरातील उपकरणे बंद पडली आहे. हे महावितरणच्या निष्काळजीपणामुळे उपकरणे बंद पडली असल्याने त्या उपकरणांची नुकसान भरपाई महावितरण कार्यालयाचे अधिकारी देणार का ? असा सवाल रहिवाश्यानी केला आहे. करंजाडे वसाहतीतील महावितरणच्या वीजेच्या लपंडावामुळे नागरिक हैराण झालेले आहेत. लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिकांनी करीत रविवारी रात्री करंजाडे कार्यालयावर धडक दिली.

अन्यथा  कार्यालयावर मोर्चा काढू..

करंजाडे वसाहतीत गेला काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या वसाहतीला वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा करंजाडेवासीयांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल.

 रामेश्वर आंग्रे - माजी सरपंच, करंजाडे ग्रामपंचायत

अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात
गेल्या तीन ते चार दिवसांपासून सेक्टर 3, 4 तसेच इतर ठिकाणी रात्रीच्या वेळी विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात आम्हाला त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी उपाययोजना कराव्यात.

- संदीप पाचपुते - नागरिक
Comments