सुदैवाने कोणालाही दुखापत नाही...
पनवेल दि.२६ (संजय कदम) : चालत्या गाडीचे टायर फुटल्याचा आवाज आल्याने कारचालकाने हडबडून डिव्हायडरला धडक दिल्याची घटना पनवेल मधील कर्नाळा खिंडीत घडली आहे. सुदैवाने या धडकेत कोणालाही इजा झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.
मुंबई येथील रहिवाशी मनोहर दामाजी सावंत (वय ६३) हे आपल्या पत्नी मनिषा सावंत (वय ६०), नाती पूर्वा रूपेश साळवी (९ वर्ष) व प्रिशा रूपेश साळवी (५ वर्ष) यांच्यासोबत रेनॉल्ट किगर गाडीने (क्र २२ बीएच ७३५४ सी) रत्नागीरी येथे जाण्यासाठी निघाले असता प्रवासादरम्यान त्यांची गाडी कर्नाळा खिंडीत आल्यावर त्यांना अचानक गाडीचे टायर फुटल्याचा आवाज आला. यामुळे हडबडून गेलेल्या मनोहर सावंत यांचे वाहनावरील नियंत्रण सुटून गाडीची डिव्हायडरच्या डाव्या बाजूस धडक बसली. सुदैवाने या धडकेत कोणालाही इजा झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या बाबत अधिक तपास पोलीस हवालदार भीमाशंकर होळगीर करीत आहेत.
फोटो : अपघातग्रस्त कार