काळभैरव मंदिरात चोरी करणारे 2 आरोपी गजाआड..
पनवेल, दि.4 (संजय कदम) ः पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत चिंचपाडा सेक्टर आर- 3 , येथील काळभैरव मंदिरातील कडी कोयंडा तोडून मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरे व दानपेटी मधील रक्कम चोरी झाल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर मंदिराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून अज्ञात आरोपींनी पहाटेच्या सुमारास आत प्रवेश करून मंदिरामध्ये असलेल्या तीन दानपेट्यांमधील रोख रक्कम तसेच परिसरातील 6 सीसीटीव्ही कॅमेरे चोरुन नेले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. दिलीप शिंदे (प्रशासन), पो.नि. प्रमोद पवार (गुन्हे), पो. उप.नि. अभयसिंह शिंदे, पोहवा रवींद्र राऊत, परेश म्हात्रे, महेंद्र वायकर, पोना विनोद देशमुख, रवींद्र पारधी, पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदारांच्या आधारे माहिती घेतली असता आरोपी रोहित साळुंखे (रा.कामोठे गाव) व मारुती केंद्रे (रा.छोटा खांदा) यांच्याबाबत माहिती मिळाल्याने सदर दोन आरोपींना सापळा रचून पनवेल परिसरातून ताब्यात घेण्यात आले असता गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल केला आहे. सदर गुन्ह्यांत त्यांचा सहभाग दिसून आल्याने अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
फोटो ः मंदिरातील चोरी