खासदार बारणे यांनी अधिका-यांसह केली ब्लॅक स्पॉटची पाहणी....
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर जड वाहने,पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नका ; खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना...


पनवेल वैभव वृत्तसेवा / ४ मे : - पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यापासून यापुढे जड वाहने आणि पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नये. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून संचलन करावे. 8 दिवसात दिशादर्शक फलक, बॅरिकेट्स, रस्ते दुरुस्त करण्याच्या सूचना मावळचे शिवसेना खासदार, केंद्र सरकारच्या रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्रीरंग बारणे यांनी अधिका-यांना दिल्या.  

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने खासदार बारणे यांनी संबंधित अधिका-यांची आज (गुरुवारी) बैठक घेतली. त्यानंतर महामार्गावरील 'ब्लॅक स्पॉट', खंडाळा येथील रस्त्याची अधिका-यांसह प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी केली. उपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक विभागाचे पोलीस उपअधिक्षक तानाजी चिखले, एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता सुर्ती नाईक, राकेश सोनवणे, पीडब्ल्यूडीचे उपअभियंता धनराज दराडे, एनएचआयचे कार्यकारी अभियंता यशवंत घोटकर, आरआयबीचे जयंत डांगरे, मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख, लोणावळ्याचे  मुख्याधिकारी पंडीत पाटील, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, सुर्यकांत वाघमारे, निलेश तरस ,विशाल हुलावळे, मुन्ना मोरे उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, महामार्गावर सातत्याने होणारे अपघात चिंताजनक आहेत. त्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. बस दरीत पडली होती. तिथे कठडा बसविण्यात आला आहे. मोठी वाहने जाऊ नयेत यासाठी बूम बसविले आहेत. यापुढे टोलनाक्यापासून जड वाहने आणि पर्यटन गाड्यांना लेन कटिंग करु देवू नये. वाहतूक विभागाच्या पोलिसांनी रस्त्यावर उभे राहून संचलन करावे. जेणेकरुन वाहनचालकांना शिस्त लागेल. अर्धवट कामे येत्या 8 दिवसात पूर्ण कराव्यात. दिशादर्शक फलक, बॅरिकेट्स, रस्ते दुरुस्त करावेत.

टनेलमध्ये वीजेची सोय नाही. तिथे वीज दिवे बसवावेत. अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील. जड वाहतूक करणाऱ्या ट्रकने लेन कटिंग केल्यास दंड आकारण्यात यावा. घाटात अधिकचे कर्मचारी वाढवावेत.  ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत.  त्या जागेवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.
Comments