दोषींवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त यांना दिले निवेदन ...
पनवेल / वार्ताहर - : वावंजे येथील जमीन फसवणूक प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी नामदेव गोंधळी यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत जी आर पाटील, अनिल ढवळे, किशोर पाटील, जनार्दन पाटील, नितीन पाटील, जिनू पाटील, देवचंद पाटील, मच्छिंद्र पाटील, शेतकरी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
पनवेल तालुक्यातील वावंजे येथील नामदेव गोंधळी यांनी स्वतःच्या हिस्स्याची जमीन विक्री केली. मात्र असे असताना त्यांचे काका यांची जमीन देखील विक्री केल्याचे दाखवून फसवणूक केल्याचा आरोप नामदेव गोंधळी यांनी केला आहे. गोंधळी यांच्या जमीन फसवणूक प्रकरणी सर्व पक्षीय शेतकरी व कष्टकरी बांधवांचा धडक मोर्चा 15 मे रोजी आयोजित करण्यात आला होता. पोलिसांनी हा मोर्चा रोखला. आणि निवेदन देण्यासाठी पोलीस उपायुक्त कार्यालयात नेले. यावेळी त्यांच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्याकडे दोषींवर कारवाई करण्याचे पत्र देण्यात आले. चौकशी करून या प्रकरणी निश्चित कारवाई करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले.
नामदेव गोंधळी यांच्या जमीन प्रकरणी सरकारी कागदपत्रांमध्ये बेकायदेशीर बदल करून जमिनीची विक्री करण्यात आले असल्याचा आरोप गोंधळी यांनी केला आहे. प्रशासनातील भ्रष्ट दोषी अधिकारी यात सामील असल्याचे गोंधळी यांनी सांगितले. जी आर पाटील यांनी या प्रकरणी शेतकऱ्याची फसवणुक करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर बनावट नकाशा तयार केला असल्याचा आरोप गोंधळी यांनी केला आहे. बेकायदेशीर बनावट नकाशा तयार करून तलाठी व मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून हा गैरप्रकार केला असल्याचा आरोप नामदेव गोंधळी यांनी केला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करावी व दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व जमीन प्रकरणात न्याय मिळावा आणि फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पोलीस उपायुक्त यांना दिलेल्या निवेदनात गोंधळी यांनी केली आहे.