दारू पिण्याचा परवाना नसणाऱ्या ग्राहकांसह ढाबामालकावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई....
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई....


पनवेल दि.२६ (वार्ताहर) : कोणताही दारू पिण्याचा परवाना नसताना ढाब्यावर अवैधरित्या दारू पिणाऱ्या ४ जणांवर राज्य उत्पादन शुल्क् पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. याप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाने ढाबामालकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर आरोपींना दोन हजार रुपयांचा दंड थोठावला आहे.
             पनवेल तालुक्यात विविध ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची माहिती पनवेल ग्रामीण निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार पनवेल-वळप रोडवरील टेम्भोडे येथे हॉटेल आई एकविरा ढाब्यावर पनवेल ग्रामीण निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क पथकाचे निरीक्षक उत्तम आव्हाड, दुय्यम निरीक्षक योगेश फटांगरे, शहाजी गायकवाड, जवान वर्ग श्री. पालवे, पवार व चव्हाण यांनी अचानक पणे छापा टाकून कोणताही दारू पिण्याचा परवाना नसताना अवैधरित्या दारू पिणारे आरोपी योगेश पांडे, प्रस्नाजीत मेत्या, अवधेश पांडे, भोसले व हॉटेल मालक नवीनचंद्र शेट्टी यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत कारवाई केली. त्यांची वैद्यकीय चाचणी करून रक्त नमुने घेण्यात आले असून त्यांच्याकडून १०६० रुपये किमतीचे विदेशी दारू जप्त केले आहे. या आरोपींना पनवेल सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने हॉटेल मालकास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी तर मद्यसेवन करणाऱ्या चारही आरोपींना २ हजार रुपयांचा दंड थोठावला आहे. तसेच यापुढेही अवैध धाबे मालक व सदर ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिला आहे.
Comments