शब्दांतील विचार महत्वाचे - माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी...
शब्दांतील विचार महत्वाचे - माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी... 

पनवेल(हरेश साठे) शब्दांना सुख दुःख नसते त्यामुळे शब्दांचे विचार महत्वाचे असतात, असे प्रतिपादन राज्याचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी मुंबई येथे केले. जीवनात पद राहत नाही तर जीवनातील पत महत्वाची असते, आणि माणुसकीची पत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी राखली आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ आणि २२ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ (दि. ०३ जून) मुंबईत पार पडला. 
          छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोरील मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, पानिपतकार विश्वास पाटील, मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त राही भिडे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, माजी अध्यक्ष देवदास मटाले, स्पर्धा समन्वयक दीपक म्हात्रे, कार्यवाह संदीप चव्हाण ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये, शैलेंद्र शिर्के, अर्थतज्ञ जे. डी. तांडेल, जगदीश भौड यांच्यासह महाराष्ट्रातील साहित्यिक, लेखक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
        दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कॄतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येते आणि या स्पर्धेला राज्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. त्यामुळे दिवाळी अंकांच्या ११२ वर्षांच्या परंपरेत खंड पडला नाही. सन २०२१ च्या अर्थात २१ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत नाशिक येथील अंकुर काळे यांच्या 'दुर्ग' अंकाने प्रथम क्रमांक पटकाविला. पुणे येथील डॉ. वंदना बोकील- कुलकर्णी यांच्या 'संवाद सेतू' आणि पुणे येथील हेमंत पोतदार यांच्या 'व्यासपीठ' अंकाने द्वितीय (विभागून), तृतीय क्रमांक(विभागून) जळगाव येथील नामदेव कोळी यांच्या 'वाघूर' आणि सोलापूर येथील इंद्रजित घुले यांच्या 'शब्दविचार' अंकाने मिळविले.  तसेच उत्कृष्ट कथेचे बक्षिस 'अक्षरधारा' अंकातील 'देव करो' या कथेने, उत्कृष्ट कविता 'शब्दरूची' दिवाळी अंकातील सदानंद डबीर यांनी, उत्कृष्ट व्यंगचित्र गजानन घोंगडे यांनी, उत्कृष्ट विशेषांक दिनकर शिलेदार यांच्या ' मी' अंकाने तर उत्कृष्ट मुखपृष्ठाचे बक्षिस रामनाथ आंबेरकर यांच्या ' किल्ला' या अंकाने पटकाविला. या स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रतिभा सराफ, रविप्रकाश कुलकर्णी, अरविंद दोंदे, श्रीकांत नाईक या साहित्यिक मंडळींनी काम पहिले. रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत शारदा धुळप यांच्या 'साहित्यआभा' अंकाने प्रथम क्रमांकाचा मान मिळविला.  द्वितीय क्रमांक प्रमोद वालेकर यांच्या 'दैनिक किल्ले रायगड' अंकाने, तृतीय क्रमांक शुभदा पोटले यांच्या 'म्हसळा टाइम्स' अंकाने तर उत्तेजनार्थ बक्षिस रत्नाकर पाटील यांच्या श्री समर्थ विचार आणि नाना करंजुले यांच्या कर्तृत्व अंकाने पटकाविले.  
           सन २०२२ च्या अर्थात २२ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत 'दीपावली' अंकाने प्रथम क्रमांक पटकावीत सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक होण्याचा सन्मान पटकाविला. 'पद्मगंधा' अंकाने द्वितीय तर 'दै. उद्याचा मराठवाडा मुक्तपर्व' अंकाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच सर्वोत्कृष्ट विशेषांक होण्याचा मान 'सकाळ स्वराभिषेक' अंकाने, सर्वोत्कृष्ट बाळ साहित्य अंक 'वयम',  उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून ' आंतरभारती', उत्कृष्ट कथेचे बक्षिस अक्षर दिवाळी अंकातील 'काम तमाम @ वाघा बॉर्डर या लेखक सतीश तांबे यांच्या कथेने, उत्कृष्ट कविता ' वाघूर दिवाळी अंकातील कवी विनय पाटील यांच्या एक थोराड झाड या कवितेने,  उत्कृष्ट मुखपृष्ठ ' उत्तम अनुवाद दिवाळी अंकाने, तसेच उत्कृष्ट व्यंगचित्र ' मार्मिक' अंकातील गौरव सर्जेराव यांच्या व्यंगचित्राने पटकाविले. याशिवाय सर्वोत्कृष्ट लेख कालनिर्णय दिवाळी अंकातील निळू दामले यांच्या विल्यम शॉन या लेखाने, लक्षवेधी परिसंवाद अंतरीचे प्रतिबिंब दिवाळी अंकातील अक्षय ऊर्जा ने, लक्षवेधी मुलाखत म्हणून दिलीप माजगावकर, संवादक दिलीप प्रभावळकर- शब्दमल्हार दिवाळी अंकाने पटकाविले. राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विजय तपास, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव व कवियत्री चित्रकार मिनाक्षी पाटील, सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत 'साहित्यआभा' अंकाने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 'दैनिक किल्ले रायगड' अंकाने, तृतीय क्रमांक  'आगरी दर्पण' अंकाने तर उत्तेजनार्थ बक्षिस 'साप्ताहिक माणगंगा' आणि 'साप्ताहिक कोकणनामा' अंकाने पटकाविले असून उत्कृष्ट कथा 'दि म्हसळा टाइम्स' मधील सु. पुं. अढाऊकर यांच्या खारे बिस्कुट कथेने, उत्कृष्ट कविता स. कोकणनामा मधील मनश्री उल्हास पवार यांच्या आई- बाबा कवितेने, तर उत्कृष्ट व्यंगचित्र साहित्य आभा अंकातील व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे यांच्या व्यंगचित्राने पटकाविले.  या सोहळ्यात शतकोत्सव साजरा करणाऱ्या 'मौज' दिवाळी अंकाचा विशेष सन्मान करण्यात आला.

बक्षिसांचे स्वरूप -
राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस ०१ लाख रुपये, व्दितीय क्रमाकांस ५० हजार तर तॄतीय क्रमाकांस ३० हजार रूपये तसेच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विशेषांकासाठी १५ हजार रुपये, बाळ साहित्य अंकासाठी ७५०० रुपये, उत्कृष्ट दिवाळी अंकासाठी १५ हजार रुपये, उत्कॄष्ट कथा, उत्कृष्ट कविता, उत्कृष्ठ मुखपृष्ठ व उत्कृष्ट व्यंगचित्रासाठी प्रत्येकी ०३ हजार रुपये, त्याचबरोबर सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह. रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रूपये, व्दितीय क्रमांकास २० हजार रूपये आणि तॄतीय क्रमाकांस १० हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी ०५ हजार रुपये आणि उत्कॄष्ट कथा, उत्कृष्ट कविता, व उत्कृष्ट व्यंगचित्रासाठी प्रत्येकी ०३ हजार रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

वाचन आणि वचन संस्कृती वाढवण्याचे काम - अरुण गुजराथी  
लोकनेते रामशेठ ठाकूर दानाच्या भावनेतून काम करतात. साधेपणात आनंद आहे आणि तो आनंद त्यांच्या कार्यातून झळकतो. सत्तेपेक्षा सत्य महत्वाचे असते आणि या भावनेतून रामशेठ ठाकूर काम करत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमातून मी एक ऊर्जा घेतली आहे. नितीमत्ता, बुद्धिमत्ता आणि मानवता महत्वाची असते. संपादक, लेखक, पत्रकार शब्दाचे पुजारी असतात. महाराष्ट्र आणि दिवाळी अंकांचे विशिष्ठ नाते आहे. जीवनात आचरण, साहित्यातील व्याकरण आणि प्रेमातील अंतकरण महत्वाचे असते. वाचन आणि वचन संस्कृती वाढवण्याचे काम या उपक्रमातून होत असून हे विधायक कार्य सर्वांना प्रेरणा देणारे आहे. 

साहित्यिकांच्या कष्टामुळे साहित्य क्षेत्राला भरारी - लोकनेते रामशेठ ठाकूर 
आदरणीय अरुण गुजराथी आणि आमचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत आजच्या कार्यक्रमाच्या निमिताने अनेक वर्षानंतरच्या भेटीनंतरही आपलेसेपणा कमी झाला नाही. जुन्या आठवणींना उजाळा मिळत आपुलकीचे नाते कायम टिकले आहे. दिवाळी अंक व मराठी साहित्य विश्वाला मोठी परंपरा आहे. आणि हा विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून विविध उपकेंमे राबविले जातात त्यामध्ये दिवाळी अंक स्पर्धा एक महत्वाचे पान आहे. साहित्यिक आणि साहित्याचा महत्व कायम राहिले त्यामुळे अशा स्पर्धांची गरज असते. सर्वांचा सहभाग आणि सहकार्याने हि स्पर्धा उत्तरोत्तर होत गेली असून साहित्य क्षेत्राला साहित्यिकांच्या कष्टामुळे भरारी मिळाली आहे. 

दिवाळी अंकामुळे बौद्धिक मशागत - ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे 
लेखन आणि साहित्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राची बौद्धिक मशागत दिवाळी अंकाने केली आहे. दिवाळी सारली असली तरी या स्पर्धेच्या माध्यमातून वाचनाच्या दृष्टिकोनातून दिवाळी सुरूच आहे. अंकात विविध साहित्य प्रकाशित होत असताना दिवाळी अंकात लेखकाने उद्याचा महाराष्ट्र, बदलता महाराष्ट्र  विकासाचा महाराष्ट्र यावर भर दिला पाहिजे, असे भावे यांनी नमूद केले. कर्मवीर अण्णांच्या शिकवणीतून लोकनेते रामशेठ ठाकूर घडले. त्यांनी कष्टातून त्यांचे विश्व निर्माण केले पण ते त्यांच्यापुरते मर्यादित राहिले नाहीत, समाजासाठी त्यांनी सर्वस्व अर्पण केले आहे. समाजाला वाहून घेतलेले ते व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्या कामाला तोड नाही, त्यामुळे त्यांच्यावर पीएचडी होईल. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्य एका भाषणात सांगण्यासारखे नाही त्यांचे कर्तृत्व खूप मोठे आहे. त्यांनी शाळा, कॉलेज, मंदिरे, सामाजिक कार्याला भरभरून दिले आहे पण न्हावेखाडी येथे स्वखर्चाने उभारलेल्या 'रामबाग' ला हि तोड नाही. त्या ठिकाणी गेल्यावर मन प्रसन्न होते, त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी त्या जागतिक दर्जाच्या उद्यानाला भेट द्यावी. 

स्पर्धेतून लेखक साहित्यिकांचा सन्मान - पानिपतकार विश्वास पाटील 
दिवाळी अंक एक परंपरा आहे. साहित्य शोधण्यासाठी लेखकाची धडपड सुरु असते त्यांना सन्मान देण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले आहे. सरकार विविध क्षेत्राला पुरस्कार देत असते मात्र दिवाळी अंक स्पर्धेला बक्षीस दिले जात पण ते काम लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी निष्ठेने केले आहे. 


लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे मनःपूर्वक आभार - नरेंद्र वाबळे
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच लेखक साहित्यिकांना प्रोत्साहन दिले आहे. राज्यातील हि सर्वात मोठी दिवाळी अंक स्पर्धा त्यांच्या मौल्यवान सहकार्यातून होत असते. त्यामुळे त्यांचे आभार मानू तेवढे कमी आहे. 

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून बोलताना सांगितले की, साहित्यिक साहित्याची सेवा करीत असताना नवोदित लेखकांना संधी देण्याचे काम होत आहे. प्रत्येक वर्षी ही स्पर्धा आयोजित करून साहित्याचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक लेखकांकडून होते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गर्शनाखाली वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.दिवाळी अंक स्पर्धेच्या सोबतच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना मोफत वह्या, गणवेश, त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत, करिअर गाईड केले जाते. त्याचबरोबरीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव, नाट्य एकांकिका स्पर्धा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून दर्जेदारपणे केले जाते. मधल्या काळात कोविड मुळे २०२१ चा पारितोषिक वितरण समारंभ झाला नाही पण त्या काळात दीड लाख लोकांना अन्नधान्य, मास्क, वैद्यकीय साहित्य, मोदी कम्युनिटी किचन भोजन व्यवस्था असे उपक्रम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून राबविण्यात आले. सामाजिक हित आणि समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गर्शनाखाली आम्ही सर्व मिळून काम करत आहोत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखीत केले.
--------------------------------------------------------------------------------
Comments