धबधब्यावरील एन्जॉयमेंट मध्ये तरुणाचा कपाळमोक्ष ; अवघड डोंगरात पोलिसांसह नागरिक मदतीला...
 डोंगरात पोलिसांसह नागरिक मदतीला... 
पनवेल दि. २३ ( वार्ताहर ) : जीवन फार किंमती आहे. मानवाचा जन्म एकदाच लाभतो. त्या जीवनाचा संपूर्ण आनंद घेतला पाहिजे. मात्र या जीवनाचा पूर्ण आनंद घेण्याआधी कधी कधी तरुणाई एन्जॉय मेंटच्या नावाखाली मृत्यूला अक्षरशः कवटाळते.आई, वडील, भाऊ, बहीण , नातेवाईक, मित्रपरिवार यांचा विचार केला जात नाही. आपल्या पश्चात त्यांचे काय होईल ? याचा विचार केला जात नाही.अशीच एक दुःखद घटना पनवेल तालुक्यातील पाले बुद्रुक ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत घडली.
                           येथून जवळच असलेल्या पडघे कोळवाडी जवळील फणसवाडी येथील धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी तळोजा येथील तीन तरुण गेले होते. हे तरुण मूळचे उत्तर प्रदेश गाजीपूरचे राहणारे आहेत.यातील एक तरुण तळोजात कायमस्वरूपी राहतो. त्याच्याकडे दोघे तरुण उत्तरप्रदेश मधून रोजगारासाठी आले होते. पूर्वी ते दोघे गुजरात राजकोटला सेंट्रिंगचे काम करायचे. रविवारी एन्जॉयमेंट केल्यानंतर सोमवारपासून ते दोघे कामावर येणार होते. मात्र एन्जॉयमेंटचा आनंद घेताना यातील राणाप्रताप राम हा सणसवाडी धबधब्यावरून पाय घसरून पडला. डोक्याला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.ही घटना फणसवाडी येथील रहिवाशी जगन भगत याना कंटोली तोडताना दिसली. त्यांनी याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना दिली. 

त्याबरोबर घटनास्थळी पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक भोईर, श्री. गळवे, पोलीस शिपाई खैरनार, संजय दोरगे, श्री. चव्हाण आदींचे पथक दाखल झाले. अवघड डोंगरात पोलिसांसह नागरिक तातडीने मदतीला पोहचले. शिवसेना पनवेल तालुकाप्रमुख संदीप तांडेल, पोलीस पाटील प्रमोद आगलावे, फणसवाडीचे नरेश भगत, जगन भगत, कमलाकर भगत, प्रकाश भगत, गुरुनाथ भोईर, उपसरपंच निखिल तांडेल, रवींद्र उलवेकर, प्रभाकर तांडेल यांनी मदतकार्य केले. मृतदेह डोंगरातील अवघड जागेतून गावाच्या ठिकाणी आणला. मृत झालेल्या तरुणासोबत गुलशन संजय रामकुमार, सुरज कैलास रामकुमार होते. अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान धबधब्यावर जाऊन मृत्यूला कवटाळू नका. जीवन अनमोल आहे. आपल्या जीवाची काळजी घ्या असे आवाहन पुन्हा एकदा पनवेल पोलीस प्रशासनाने केले आहे.
Comments