करंजाडेत "पाणी समस्या"ची दहीहंडी फोडली पनवेल कोळीवाडा पथकाने...
सिडकोला पुन्हा जागे करण्यासाठी निषेध म्हणून दहीहंडीचे आयोजन 
करंजाडे शैक्षणिक सामाजिक विकास मंडळाचे आयोजन..

पनवेल/प्रतिनिधी :-- करंजाडे वसाहतीत पाणी समस्याकडे दुर्लक्ष करण्याऱ्या सिडकोचा निषेध म्हणून करंजाडे शैक्षणिक सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष मा. सरपंच रामेश्वर आंग्रे व मा. उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली दहीहंडी उत्साहात पार पडली. यावेळी या मानाची दहीहंडी पनवेल कोळीवाडा येथील जय महाराष्ट्र शिवतेज मित्र मंडळ पथकाने दहीहंडी फोडली.

याप्रसंगी कार्यक्रमाला आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष उद्योजक जे.एम.म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू, मा. उपसरपंच योगेंद्र कैकाडी, समाजसेवक सनी कैकाडी, यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी कार्यक्रमाप्रसंगी भेट दिली.

समस्या आणि करंजाडे वसाहत समीकरण बनत चालले आहे. याला सिडको जबाबदार आहे. सिडकोच्या दुर्लक्षामुळे करंजाडेसह अनेक वसाहती समस्याने ग्रस्त झाल्या आहेत. त्यातच करंजाडे वसाहतीमधील नागरिक गेल्या सहा महिन्यांपासून पाण्यापासून वंचित आहेत. मा सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोविरोधात जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्याचबरोबर या जलआक्रोश मोर्चा बरोबरच सिडकोला करंजाडेच्या पाणी समस्याबाबत पुन्हा जागे करण्यासाठी मा सरपंच रामेश्वर आंग्रे, मा उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या माध्यमातून "पाणी समस्याच्या" दहीहंडी चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी   मुंबई, ठाणे, कर्जत, पनवेल, नवी मुंबईतील सुमारे 20 ते 25 दहीहंडी पथकाने चार, पाच, सहा थरांची सलामी दिली. यावेळी सलामी देण्याऱ्या पथकाचे आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर यावर्षी पनवेल कोळीवाडा येथील जय महाराष्ट्र शिवतेज मित्र मंडळ पथकाने सलामी देत करंजाडेतील "पाणी समस्याची दहीहंडी" फोडली. यावेळी मा सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सांगितले की सिडको ही गेंड्याच्या कातडी सारखी आहे. त्यांना आम्हां करंजाडे वासियांच्या पाणी समस्याबाबत काहीही पडलेले नाही. जल आक्रोश मोर्चादरम्यान पाणी समस्या दूर करू असे आश्वासन दिले. मात्र आजही आमच्या करंजाडे वासियांना त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी लढावे लागत आहे. त्यामुळे या समस्याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांना पुन्हा जागे करण्यासाठी निषेध म्हणून करंजाडे पाणी समस्या म्हणून दहीहंडी चे आयोजन केले असल्याचे आंग्रे यांनी सांगितले. तसेच मित्रपरिसरासह करंजाडेकर, प्रशासन व पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.
Comments