कामोठे मधील पार्किंगची समस्या सोडविण्याची शेतकरी कामगार पक्षाची मागणी...
वाहतूक शाखा व महापालिकेकडे मागणी 
पनवेल / वार्ताहर : -
सिडकोने २००३ पासून कामोठे नोड विकसित करण्यास सुरुवात केली. आजमितीला कामोठे शहरातील लोकसंख्या 2-3 लाखात आहे.
त्यात सिडकोने पंतप्रधान आवास योजना राबवून कामोठेला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे. शहरात अनेक समस्या असून त्यात पार्किंगची समस्या भयानक आहे. कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक गर्दीत जाण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबात दुचाकी-चार चाकी गाडीचा प्रवेश झाला.

कामोठे मध्ये बहुसंख्य घरात गाड्या आल्या मात्र गाडी पार्क कुठे करणार हा मात्र यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात वाहतूक पोलिस कार्यवाही करत आहेत. खांदेश्वर आणि मानसरोवर स्टेशनवर खांदा कॉलनी तसेच कळंबोली मधील प्रवासी स्टेशन परिसरात वाहने पार्किंग करून पुढे कामावर जात आहेत. मात्र दोन्ही स्टेशन परिसरात पार्किंगसाठी जागा अपुरी असल्याने रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे गर्दीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत आहेत. नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे. गेल्या पाच वर्षात परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे पण त्याचवेळी पालिकेतील सत्ताधारी आणि आता प्रशासन यांनी सोयीनुसार दुर्लक्ष केले आहे.
नागरिकांचा होणार त्रास कमी व्हावा यासाठी कामोठेत बहुमजली वाहनतळ उभे करावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, अल्पेश माने, नितीनी पगारे, शहर अध्यक्ष अमोल शितोळे यांनी पनवेल महानगर पालिकेकडे तसेच वाहतूक शाखेकडे केली आहे.
Comments