लेखणीमध्ये समाज परिवर्तनाची ताकद - कवी रामदास फुटाणे ...
पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न..

पनवेल : -  समाजात प्रचंड अस्थिरता पसरली आहे.प्रत्येक माणूस हा आडनाव आले की जात कोणती आहे? धर्म कोणता आहे? हे पाहिले जाते. व्यासपीठावर शाहू-फुले यांचे नाव घेतो पण व्यासपीठावरून खाली उतरलो की जातीच्या पलीकडे विचार करत नाही,त्यामुळे समाज कोणत्या दिशेने चालला आहे हे कळत नाही,अशा वेळेस लेखणीमध्ये समाजपरिवर्तनाची ताकद आहे.लेखणी समाजाला दिशा देऊ शकते असे उद्गार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी- लेखक रामदास फुटाणे यांनी पनवेल येथे साप्ताहिक पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळ्याप्रसंगी काढले.

या सोहळ्यास सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे,चित्रपट-नाट्य निर्मात्या कल्पना विलास कोठारी,पनवेल औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विजय लोखंडे,माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला,पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी उपस्थित होते.या सोहळ्यात पनवेलचे नाव उंचावणाऱ्या व्यक्ती आणि सेवाव्रती संस्थांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

यापुढे बोलताना रामदास फुटाणे म्हणाले,ईश्वरनिर्मित नर आणि मादी या दोनच जाती आहेत.जात आणि धर्म हे मानवनिर्मित आहेत. आज लोक जातिवंत झाले आहेत. कोणीही आपली जात सोडायला तयार नाही.जात माणसानेच तयार केली आहे. प्रत्येक घरात मुलांना कुठल्यातरी धर्माचा द्वेष करायला शिकवणार आहोत का? याची गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे ती जबाबदारी लेखक-पत्रकारांची आहे.आज जबाबदारीने लिहिणाऱ्या पत्रकाराला ही त्रास होतो.वेळप्रसंगी खरं लिहिणाऱ्या पत्रकाराला मार ही खावा लागतो. अशा वेळेस समाज एकसंध बांधणे ही काळाची गरज आहे. पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराचे आयोजन केल्याबद्दल पनवेल टाइम्सचे फुटाणे यांनी कौतुक केले.

सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी, पनवेल हे उद्या मोठे शहर बनणार आहे. पनवेल हे मुंबई-पुणे महामार्गावर एक महत्त्वाचे शहर आहे,त्यामुळे उद्याच्या सांस्कृतिक विश्वाची जबाबदारी पनवेलवर आहे.ते काम पनवेल टाइम्सने सुरु केले आहे,एका अर्थाने सामाजिक-शैक्षणिक-सांस्कृतिक विश्वाची जबाबदारी घेतली असल्याचे अरुण म्हात्रे यांनी सांगितले.पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी यांनी आपल्या प्रास्ताविकात,समाजात व्यक्ती आणि संस्था अनेक चांगल्या पद्धतीचं काम करत आहेत,अशा व्यक्ती आणि संस्थांचे कौतुक व्हावे या उद्देशाने पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना केणी यांनी केले.

या सोहळ्यात एक गाव एक गणपती गणेशोत्सव साजरा करणारे पनवेलच्या मोहो गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,पनवेल ट्रेकर्स,ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख, रायगड जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षिका ज्योती भोपी,जेष्ठ पत्रकार घनश्याम मानकामे, वृक्षप्रेमी चार्वी चौबळ व सांगवी चौबळ,उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर,सीमेवरील सैन्यांना दिवाळी फराळ पाठवणारे भारत विकास परिषद पनवेल, कराटे कोच मंदार पनवेलकर, सामाजिक-सांस्कृतिक काम करणारी दिशा महिला सामाजिक संस्था,स्वच्छतेविषयी काम करणारी सिटीजन वेल्फेअर असोसिएशन,चित्रपट नाट्य- निर्मात्या कल्पना कोठारी, रंगकर्मी शामनाथ पुंडे,शुद्ध पाण्यासाठी लढा देणारे लाडिवली महिला मंडळ,डॉ.प्रा.आमोद ठक्कर,रस्त्यावरील चहा विक्रेता रवींद्र मगर,नॅपकिन बुके निर्मात्या मानसी पोळ यांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image