"प्रधानमंत्री सूर्य घर मोफत विज योजने" साठी डाक विभागाचे घरोघरी सर्वेक्षण सुरू...
नवी मुंबई डाक विभागातर्फे ४८२० नागरिकांची नोंदणी....

पनवेल वैभव वृत्तसेवा :- 
             विजेच्या बाबतीत देशातील नागरिकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी केंद्र सरकारने 'प्रधानमंत्री सूर्य घर मोफत विज योजना' हाती घेतली आहे. या योजने अंतर्गत घरावर सौरऊर्जा पॅनल उभे करण्यासाठी केंद्र सरकार नागरिकांना आर्थिक साहाय्य देणार आहे. या योजनेच्या माध्यमातून घरगुती विज निर्मितीला चालना देण्याचा सरकारचा मानस असून त्याद्वारे पर्यावरण अनुकूल विज निर्मितीला प्रोत्साहन मिळणार आहे.
         'प्रधानमंत्री सूर्य घर मोफत विज योजने'च्या प्रभावी अंमलबजावणी साठी सर्वेक्षण आणि नोंदणीची जबाबदारी भारतीय डाक विभागाला देण्यात आली आहे. भारतीय डाक विभागाची पोहोच देशातील प्रत्येक गाव खेड्यांपर्यंत आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत असल्याने 'प्रधानमंत्री सूर्य घर मोफत विज योजनेचा' सर्वदूर प्रचार होण्यास मदत होणार आहे. डाक विभागातील पोस्टमन बांधव आणि ग्रामीण डाक सेवक घरोघरी जाऊन प्रधानमंत्री सूर्य घर मोफत विज योजनेची माहिती नागरिकांना देत आहेत. नवी मुंबई डाक विभागात आतापर्यंत ४८२० कुटुंबांची नोंदणी झालेली आहे.
         प्रधानमंत्री सूर्य घर मोफत विज योजने अंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवणा-या कुटुंबाला दोन किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी 30 हजार  तर तीन किलो वॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न होणारी वीज नागरिक महावितरणला विकू शकणार आहेत. प्रधानमंत्री सूर्य घर योजनेमुळे नागरिक विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असून त्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन सुद्धा उपलब्ध होणार आहे.

योजनेचे निकष -
नोदणी करणा-या व्यक्तीचे स्वतःचे घर व वीज जोडणे आवश्यक आहे.
सोलर पॅनल साठी  पुरेशी जागा असावी.
वीज मिटर स्वतःच्या नावावर असावे.
   
" प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेचे सर्वेक्षण डाक विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन करणार आहेत. दिनांक 14 मार्च पर्यंत हे सर्वेक्षण असणार आहे. विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार असून नागरिकांनी नोंदणीसाठी डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे." 
   - मोहम्मद साहिद,
     वरिष्ठ अधीक्षक डाकघर,
     नवी मुंबई डाक विभाग.
Comments