खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि कळंबोली परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची शेकापची सिडकोकडे मागणी..
पाणी पुरवठा सुरळीत करण्याची शेकापची सिडकोकडे मागणी..
पनवेल दि.२२ (वार्ताहर): खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि कळंबोली परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची शेतकरी कामगार पक्षाने सिडकोचे अधिकारी बी. वी. गायकवाड यांची भेट घेऊन मागणी केली आहे. 
            गेल्या काही दिवसांपासून खांदा कॉलनी, नवीन पनवेल आणि कळंबोली परिसरात सिडकोद्वारे केला जाणारा पाणी पुरवठा पूर्णतः बंद आहे. पाणी पुरवठ्याची पाइपलाइन फुटल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी हा पाणीपुरवठा बंद केला आहे. याबाबत सिडकोने घेतलेल्या शटडाऊनचा वेळ संपून देखील अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने शेकापने याबाबत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची भेट घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
सिडकोने हाती घेतलेले दुरुस्तीचे काम दि.२० रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पूर्ण झाले आहे.  २४ तास उलटूनही अद्याप या तीनही ठिकाणी पाणी पुरवठा सुरळीत नसल्याचा आरोप शेकापचे महादेव वाघमारे यांनी केला आहे. त्यामुळे सोसायट्यांमधील रहिवाशांना स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी मागवून 'घ्यावे लागत आहे. 
यावेळी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी. वी. गायकवाड यांची भेट घेऊन शेकाप कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी निवेदन दिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, परिवर्तन सामाजिक संस्थेचे कार्यालयीन सचिव प्रकाश पाटील उपस्थित होते.



फोटो: पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करताना शेकाप पदाधिकारी
Comments