महाविकास आघाडीच्या प्रचार बैठकांना मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद...
पनवेल / प्रतिनिधी.
१८ व्या लोकसभा निवडणुकांच्या साठी होणारा प्रचार टिपेला पोहोचत आहे.रविवार चा दिवस प्रचारासाठी अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व बाळगून असतो. ३३ मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ रविवार दिनांक २८ एप्रिल रोजी पनवेल विधानसभा मतदारसंघातील नेरे आणि वावंजे जिल्हा परिषद गट हद्दीतील गावांना भेटी देण्यावर जोर देण्यात आला. प्रत्येक गावात महाविकास आघाडीच्या नेत्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. गाव बैठकांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता ग्रामीण विभागातून संजोग वाघेरे पाटील आघाडीवर राहतील असे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.
पनवेल मतदार संघामधील वावंजे
जिल्हा परिषद गट हा महत्त्वाचा ग्रामीण विभाग समजला जातो. याच मतदार संघातून शेतकरी कामगार पक्षाच्या योगिता पारधी विजयी झाल्या होत्या. आदिवासी समाजातील उच्चशिक्षित योगिता पारधी यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून नेत्रदीपक कामगिरी करून दाखविली होती. या जिल्हा परिषद गटामध्ये वावंजे आणि चिंध्रण असे दोन पंचायत समिती गण येतात. या दोन्ही गणांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे प्राबल्य आहे. पनवेल पंचायत समितीच्या कारभाराचा रिमोट कंट्रोल ज्यांच्या हाती आहे असे काशिनाथ पाटील येथील वावंजे पंचायत गणातून भरघोस मताधिक्याने निवडून आलेले आहेत. तर शेकाप च्या वृषाली अरुण देशेकर यांनी चींध्रण पंचायत समिती गणातून घरच्या भेदयांना आसमान दाखवले होते.विशेष म्हणजे या निवडणुकांचे वेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी अत्यंत सुंदर समन्वय राखत भाजप आणि मित्र पक्षांना धूळ चारलेली होती.
रविवारी सकाळी ठीक १० वाजता गाव बैठकांना प्रारंभ करण्यात आला. आदई, नेवाळी, कोळवाडी, पाले बुद्रुक,वलप, कानपोली, खेरणे, नितळस, वावंजे, चिंध्रण, शिरवली, कुत्तरपाडा, महाळूंगे, मोर्बे, खानाव, वाकडी, तळोजा पांचनंद,केवाळे ,हरीग्राम या गावांच्यात प्रचार बैठका संपन्न झाल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विद्यमान खासदारांच्या निष्क्रिय कार्यप्रणालीवर जोरदार शाब्दिक प्रहार केले.संजोग वाघेरे पाटील यांच्या रूपाने जनसामान्यांचा खराखुरा प्रतिनिधी दिल्लीला पाठवा असे आवाहन सर्वच वक्त्यांनी मतदारांना केले.
प्रचार बैठकांसाठी माजी आमदार बाळाराम दत्तूशेठ पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विशेष सदस्य आर सी घरत
जिल्हाप्रमुख शिरीष घरत, शेकापचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य काशिनाथ पाटील,काँग्रेस पनवेल शहर जिल्हाअध्यक्ष सुदाम गोकुळशेठ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक सतिश पाटील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हेमराज नाथाशेठ म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी,शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील,पनवेल तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, प्रदीप ठाकूर आदी नेत्यांच्या समवेत पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.