विद्यमान खासदारांना मत म्हणजे दुहेरी मालमत्ता कराला मान्यता ; शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू यांचा मतदारांना सावधानतेचा इशारा
शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू यांचा मतदारांना सावधानतेचा इशारा ..
पनवेल / वार्ताहर :- 
पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये भाजपा व मित्र पक्षांनी दुहेरी मालमत्ता कराचा बोजा नागरिकांच्या डोक्यावर मारला आहे. दुहेरी मालमत्ता कराच्या बाबत चित्रविचित्र भूमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांवर शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू यांनी ताशेरे ओढले.ते म्हणाले की मतदारांनी जर का विद्यमान खासदार महोदयांना मत दिले तर एक प्रकारे त्यांनी लादलेल्या दुहेरी कराला मान्यता दिल्याचा तो प्रकार होईल.
          येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश कडू यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की विद्यमान खासदारांना पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातून दोन्ही वेळेस चांगले आणि विजयी मताधिक्य मिळालेले आहे.असे असले तरी पनवेलकर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात त्यांना अपयश आले आहे. खंडाळ्याच्या घाटाखाली असणाऱ्या तिन्ही मतदारसंघाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे. या निवडणुकीत पनवेलची जनता त्यांना दुहेरी मालमत्ता कराचे बाबत प्रश्न विचारणारच. अनेक नागरिक,कित्येक सेवाभावी संस्था,रहिवासी संघटना त्यांच्या कडे दुहेरी मालमत्ता कराचा मुद्दा घेऊन गेले असतील.परंतु या सगळ्यांच्या पदरात आश्वासनांचे व्यतरिक्त काहीही पडलेले नाही.
      पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीला सामोरे जाताना भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पुढील पाच वर्षे कर वाढ होणार नाही असे आश्वासन दिले होते.परंतु सत्ता ताब्यात आल्यावर त्यांनी या आश्वासनाला हरताळ फासला.पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील ७८ टक्के भूभाग हा सिडकोने विकसित केलेल्या वसाहतींचा आहे.यात प्रामुख्याने खारघर,कामोठे,कळंबोली,नवीन पनवेल,खांदा कॉलनी,तळोजा फेज १/२ हे नोड्स येतात.येथील नागरिकांना सिडको आस्थापन पायाभूत सुविधा पुरवत असे.त्यासाठी या नोडस् मधील नागरिक त्यांना सेवाशुल्क अदा करायचे. परंतु महानगरपालिकेच्या निर्मितीनंतर ऑक्टोबर २०१६ पासून या नागरिकांना पूर्वलक्षी प्रभावाने कर भरावा लागत आहे. अशाप्रकारे अन्यायकारक पद्धतीने दुहेरी कराचा बोजा नागरिकांवर लादणे हा खरं तर अक्षम्य गुन्हा आहे. अनेक तक्रारी प्राप्त होऊन देखील विद्यमान खासदार महोदयांनी या प्रश्नावर काहीही केलेले नाही. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी जर का त्यांना मते दिली तर एक प्रकारे या जाचक दुहेरी कराच्या प्रणालीला मान्यता देण्याचा तो प्रकार होईल.
      गणेश कडू पुढे म्हणाले की मुळात पनवेल महानगरपालिकेमध्ये जो कर लादला आहे तो अन्य महानगरपालिकेच्या तुलनेत अडीच पटींनी जास्त आहे.सभगृहातील एक सदस्य या नात्याने शेकाप आणि मित्र पक्षाच्या सदस्यांनी या कर प्रणाली लागू करण्याच्या पद्धतीला विरोध केला होता. भाजपा च्या नगरसेविका लीना गरड यांनी सुद्धा या कर प्रणाली विरोधात आवाज उठवून सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला होता. नवी मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगर पालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील प्रति स्क्वेअर फुट प्रति महिना मूल्यांकन करून  पनवेल महानगरपालिका कराचे सोबत मी स्वतः तुलना केली आहे.त्यामुळे अवास्तव महाग कर आणि त्यात दुहेरी मालमत्ता कराचे लोढणे असा हा कर रुपी राक्षस नागरिकांना त्रास देत आहे. जर विद्यमान खासदारांना मत दिलं तर हा जाच निमूट पणाने सहन करण्यावाचून नागरिकांकडे दुसरा काही पर्याय उरणार नाही. त्यामुळे मतदार राजाने वेळेत जागरूक व्हावे असे आवाहन गणेश कडू यांनी केले आहे.
Comments