तळोजा भागातुन ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; पोलिसांकडुन अपहरणकर्त्याचा शोध सुरु..
पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः तळोजा एमआयडीसी भागातील झोपडीत राहणाऱया एका महिलेच्या 7 महिन्याच्या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
या घटनेतील तक्रारदार महिला रविना इस्राईल अन्सारी (22) हि महिला व तीचा पती तळोजा एमआयडीसीतील असाही ग्लास कंपनीच्या बाजुला असलेल्या झोपडीमध्ये राहण्यास असून ते रस्त्यावर फुगे विकून आपला उदरनिर्वाह करतात. रविना अन्सारी हिने आपल्या 7 महिन्यांच्या बाळाला झोपडीमध्ये पाळण्यात झोपवले होते. त्यानंतर ती झोपडीच्या बाहेर जेवण करण्यासाठी बसली होती. याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने अंधारामध्ये रविनाच्या झोपडीमध्ये घुसून तिच्या 7 महिन्याच्या बाळाला उचलुन नेले. काही वेळानंतर रविना आपल्या झोपडीमध्ये गेली असता, पाळण्यामध्ये तिला तिचे बाळ दिसून आले नाही. त्यामुळे तीने आजुबाजुला सगळीकडे आपल्या बाळाची शोधा-शोध केली. मात्र तिला तीचे बाळ मिळुन आले नाही. त्यानंतर रविनाने मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तळोजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेतील अपहरण झालेल्या 7महिन्याच्या बाळाचा रंग गोरा असून तो अंगाने सडपातळ आहे. तसेच त्याचे नाक सरळ व केस भुरकड काळे रंगाचे आहेत. बाळाचा चेहरा गोल असून त्याच्या दोन्ही हातामध्ये काळ्या रंगाचे फ्लॅस्टीकचे कडे तसेच उजव्या हतात धाग्यात गुंफलेली काळ्या मण्यांची माळ व गळ्यात फिक्कट पिवळ्या रंगाचा धागा बांधलेला आहे. या वर्णनाचे 7 महिन्याचे बाळ कुणाला आढळुन आल्यास त्याची माहिती तत्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन तळोजा पोलिसांकडुन करण्यात आले आहे.
फोटो ः बाळ