'कमवा आणि शिका' उद्दिष्टाने कमवले “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” चे सदस्यत्व आणि 'मास्टर ऑफ लॉ' पदवी ; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले अभिनंदन व कौतुक..
पनवेल (प्रतिनिधी) कुटूंब सधन असतानाही आपल्या शिक्षणासाठी कोणतीही आर्थिक मदत न घेता 'कमवा आणि शिका' या उद्दिष्टाप्रमाणे “बार काउन्सिल ऑफ़ इंडिया” सदस्यत्व आणि "मास्टर ऑफ लॉ” ही एक प्रगत पदव्युत्तर शैक्षणिक पदवी अर्थात एलएलएम शिक्षण पूर्ण केल्याबद्दल उत्कृष्ट सतारवादक असलेले वैभव उमेश चौधरी यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करून कौतुक केले. 
         यावेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, रायगड भूषण पंडित उमेश चौधरी, प्रभाकर जोशी उपस्थित होते.  वैभव यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण विधी क्षेत्रात करण्याचे ठरवले. त्याचवेळी ते उस्ताद रफात खान यांच्याकडून सतार वादनाचे धडेही गिरवत होते. मात्र हे करत असताना आपले कुटुंब आर्थिक दृष्ट्या सक्षम असले तरी घरातून एक रुपयाही न घेता शिक्षण पूर्ण करण्याचा मानस त्यांनी उराशी बांधला होता. आजोबा भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी व वडील उमेश चौधरी यांचा आशीर्वाद घेऊन वाटचाल करत असताना आणि कुटुंबाची आर्थिक बाजू ध्यानात न घेता कमवा आणि शिका या उक्तीनुसार त्यांनी स्वतःहून पाऊल टाकले. आणि पैशाचा अहंकार कधीही स्वतःच्या अंगाला शिवून घेतला नाही. या दरम्यान कपडे विकणे, वॉटर प्लांटच्या माध्यमातून पाणी विकणे आणि त्या पुढे जाऊन त्यांनी दुधाचा तबेला सुरु केला आणि या व्यवसायाच्या अनुषंगाने होणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून सतारवादनचे शिक्षण घेत असून नुकताच प्रतिष्ठित अशा विधीज्ञ हे शिक्षण पूर्ण केले. या सर्व प्रवासात त्यांनी केलेले कष्ट हे युवा पिढीला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी असलेली एक चांगली शिकवण असून स्वकर्तृत्वाचा एक आदर्श पायंडा आहे. त्यांच्या या स्वकर्तृत्वाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
Comments