ब्लू पॅन्थर्स चे विविध मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन
पनवेल/ वार्ताहर : -
संपूर्ण देशातच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्रात मागील काही वर्षापासून अनेक अनुचित प्रकार घडलेले आपण पाहिले आहे. मुलींची बलात्कार करून हत्या केली जाते, तर कुठे अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकार घडत आहेत, अक्षता म्हात्रे,यशश्री शिंदे त्यांच्या बाबतीत घडलेले प्रकार ताजे असताना बदलापूर मध्ये दोन चिमुरड्या मुलींवर केलेले लैंगिक अत्याचार मन हेलावून टाकणारे आहेत शाळेत जाणाऱ्या मुली देखील सुरक्षित नाहीत ही पालकांसाठी चिंतेची बाब आहे पनवेल सारख्या शहरांमध्ये वाढती लोकसंख्या लक्षात घेता शाळांचे प्रमाणही वाढले आहे बदलापूर सारख्या घटना टाळण्यासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर कर्मचारी यांचे पोलीस व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे शाळांमध्ये महत्त्वाचे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, महिला स्वच्छतागृहाच्या शेजारी महिला कर्मचारी नेमणे, नवीन नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणे या आणि अशा अनेक मागण्यांसाठी महापालिका आयुक्त, पनवेल तहसीलदार, शहर व तालुका पोलीस स्टेशन तसेच गटविकास अधिकारी पनवेल यांना निवेदन देण्यात आले.
तसेच नुकताच सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व जमाती यांच्या संदर्भात अंतर्गत उपवर्गीकरण व क्रिमीलेअर सारखे दिलेले निर्णय समाजासाठी व येणाऱ्या पिढीसाठी हानिकारक आहेत, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण होऊन फूट पडू शकते, त्यामुळे हा असंवैधानिक निर्णय तात्काळ रद्द करावा असे निवेदन उपरोक्त प्रशासनाला देण्यात आले, तसेच भूमिहीनांना भूमीहिन असल्याचा दाखला लवकरात लवकर देण्यात यावा, यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना तातडीने आदेश द्यावेत अशा प्रकारचे निवेदन पनवेल तहसीलदार यांनाही देण्यात आले, निवेदन देत असताना संबंधित प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा करण्यात आली, उपरोक्त प्रशासनाने आपल्या मागण्यांचा स्वीकार करून संबंधित प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
यावेळी आंबेडकर चळवळीचे तसेच ब्ल्यू पँथर्स ग्रुपचे नरेंद्र गायकवाड, प्रवीण खंडागळे, राज सदावर्ते, विजय गायकवाड, सचिन तांबे, विजय गायकवाड, सचिन कांबळे, कुणाल लोंढे, आनंद गायकवाड, नितीन कांबळे, सुधीर पवार, नितीन शिंदे, दिनेश कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते