रविवारी 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर'..

रविवारी 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर'


पनवेल (प्रतिनिधी) अखंडपणे समाजोपयोगी उपक्रमे राबविणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, भारतीय जनता पार्टी, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०४ ऑगस्ट रोजी १६ वे 'विनामूल्य आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर' होणार आहे. 

      खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी ०९ वाजता या शिबिराला सुरुवात होणार आहे. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रवीशेठ पाटील, आमदार महेश बालदी, माजी आमदार व भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तर प्रमुख मान्यवर म्हणून एम. जी. एम. मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे डीन डॉ. जी. एस. नरशेट्टी, नामवंत शल्य चिकित्सक डॉ. गिरीष गुणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

        या महाशिबिरात सर्वसाधारण रोग तपासणी, बालरोग तपासणी, महिलांचे आजार, त्वचारोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दंतरोग तपासणी, मधुमेह तपासणी, नाक, नाक व घसा तपासणी, हाडांचे रोग तपासणी, कर्करोग तपासणी, क्षयरोग तपासणी, होमिओपॅथिक तपासणी, आयुर्वेदिक तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त तपासणी, तसेच नेत्र तपासणी व चष्मे वाटप, कृत्रिम हात व पाय बसविणे, अशा विविध आरोग्य तपासण्यांसह, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार देण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड तयार करून देण्यात येणार असून महात्मा फुले योजनेंतर्गत आधारकार्डला लिंक करून देण्याचीही सुविधा या ठिकाणी असणार आहे. यावेळी दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार असून अवयदानाचे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव परेश ठाकूर, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत यांनी केले आहे. 

Comments