पनवेल उरण महाविकास आघाडीची एल्गार परिषद संपन्न ...
पनवेल व उरणच्या नागरी प्रश्‍नावर सरकारचे दुर्लक्ष, सरकार बदलणे गरजेचे ः अध्यक्ष बबनदादा पाटील
पनवेल वैभव, दि.17 (वार्ताहर) ः पनवेल व उरणच्या नागरी प्रश्‍नावर सरकारचे पूर्ण दुर्लक्ष असून हे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने आगामी निवडणुकीत हे सरकार बदलणे गरजेचे असल्याचे मत आज पनवेल-उरण महाविकास आघाडीचे  अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी पनवेल येथे आयोजित एल्गार परिषदेमध्ये व्यक्त केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाविकास आघाडीने पनवेल मध्ये दंड थोपटले आहेत. यासंदर्भात आज पनवेल मधील वीरूपक्ष मंगल कार्यालय येथे उरण पनवेल महाविकास आघाडी तसेच सिडको बाधित पनवेल महानगरपालिका बाधित प्रकल्पग्रस्त संघटना यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार परिषेदेचे आयोजन करण्यात आले होते. या एल्गार परिषदेला पनवेल - उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादीच्या उरण विधानसभा अध्यक्षा भावनाताई घाणेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायणशेठ घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष व समितीचे सचिव सुदाम पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर सी.घरत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, स्वाभिमानी रिपब्लिकनचे महेश साळुंखे, काँम्रेडचे सुधाकर पाटील, पनवेल तालुका चिटणीस गणेश कडू, हेमराज म्हात्रे, रिपब्लिकन पार्टीचे महेश साळुंखे, अ‍ॅड.सुरेश ठाकूर, शेकाप नेते काशिनाथ पाटील, शशिकांत बांदोडकर, भिमकांत पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विश्‍वास पेटकर, शहरप्रमुख गुरुनाथ पाटील, युवा सेनेचे पराग मोहिते, राजेश केणी, वामन शेळके, शेकापचे देवा पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना बबनदादा पाटील यांनी सांगितले की, पनवेलमधील नैनाचा प्रश्‍न त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या घरांचा, 12.5 टक्क्यांचा प्रश्‍न, वाढता मालमत्ता, पाण्याचा प्रश्‍न, डंम्पिंग, बेरोजगारी, नागरी सुविधा आदी संदर्भात वारंवार शासन दरबारी पत्रव्यवहार करूनही शासनाला जाग येत नाही आहे. यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. तरीही शासन आपल्या मागण्या मान्य करत नसल्याने आता आगामी निवडणुकीत या शासनाला बदलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना मा.आ.बाळाराम पाटील यांनी सांगितले की,  यावेळी बाळाराम पाटील यांनी नवी मुंबई विमानतळाच्या मुद्द्यावर दिबांचे नाव मिळण्यासाठी आम्ही आग्रही असताना भाजपने राजकारण करून बैठक रद्द झाल्याचे भासवित दुसर्‍या दिवशी नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन देताना भाजपचे दोन आमदार उपस्थित असल्याबद्दल भाजप कसे राजकारण खेळत आहे त्याचा प्रत्यय आला. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात पलावा सिटीमध्ये मालमत्ता कर 500 स्क्वेअर फुटापर्यंत माफ केला जातो, नवी मुंबई महानगरपालिकेत देखील 500 स्क्वेअर फुटापर्यंतचा मालमत्ता कर रद्द केला जातो, मग पनवेल महानगरपालिकेतील नागरिकांसाठी हा कर रद्द का केला जात नाही ? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. नैना प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन थांबले नसून काही कालावधीसाठी खंडित झाले होते, मात्र नैनाचा प्रश्‍न आजही ऐरणीवर आहे. नैना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पनवेल उरण महाविकास आघाडी कटिबद्ध राहील तसेच नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देणे हा मुख्य विषय आहे असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर यावेळी बोलताना सुदाम पाटील यांनी सांगितले की,  पनवेल महानगरपालिका हद्दीतील नागरिक असो किंवा मग सिडको हद्दीतील नागरिकांचे प्रश्‍न असोत, गेली 15 वर्षे येथील आमदारांना संधी देवून देखील त्यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष दिले नाही. त्यांच्या गरजेपोटी घरांचे प्रश्‍न धूळखात पडून ठेवले आहेत. त्यामुळे या अशा ढोंगी भाजपच्या खोट्या अमिषाला आता जनता बळी पडणार नाही. यासाठीच आम्ही पनवेल - उरण महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त, शेतकरी, सिडकोबधित तसेच पनवेल महानगरपालिका बाधित संघटनांना सोबत घेवून ठोस भूमिका ठरवू असे सांगितले तर मा.विरेाधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सुद्धा आगामी काळात येणार्‍या विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण होणार आहे. यासाठी नोकर्‍या स्थानिक भूमीपुत्रांना लागण्यासाठी महाविकास आघाडीने विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच आपली भूमिका परराज्यातून आलेल्या लोकांना पटवून देण्यासाठी त्यांच्याशी सातत्याने संपर्कात राहणे सुद्धा महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले व येत्या 22 तारखेला या संदर्भात  ठोस भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी आपली भूमिका मांडत शासनाचा निषेध केला आहे.


फोटो ः बबनदादा पाटील मार्गदर्शन करताना
Comments