निधीसाठी नाटकाच्या प्रयोगाचे पनवेलमध्ये आयोजन..
कळंबोली (दिपक घोसाळकर) : अलिबागहून नवी मुंबई, पनवेल मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या अलिबाग मधील रहिवाशांना कायमस्वरूपी एक व्यासपीठ ,सभागृह ,राहण्याची व्यवस्था, सांस्कृतिक कार्यालय असावे यासाठी अलिबाग कर पनवेल मध्ये अलिबाग भवन बांधण्यासाठी सरसावले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून यासाठी अलिबाग मधील समाज बांधव या कामासाठी झटत आहेत .यासाठी निधीची आवश्यकता मोठी आहे .अलिबाग भवन होण्यासाठी मोठा निधी जमावा यासाठी पनवेल मधील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हरवलेल्या पत्त्यांचा बंगला नाटकाचा नाट्यप्रयोग शनीवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेला आहे. सदर नाटकातून उत्पन्न मिळालेला निधी हा अलिबाग भवन बनवण्यासाठी वापरला जाणार असल्याचे अलिबाग तालुका रहिवासी संघाचे अध्यक्ष आल्हाद पाटील यांनी सांगितले आहे .यासाठी समाज बांधवांना अलिबाग भवन होण्यासाठी जास्तीत जास्त निधी जमवण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.
अलिबाग तालुक्यातील जवळपास ३५०० कुटुंबे मोठ्या संख्येने पनवेल नवी मुंबई या परिसरात कायमचे वास्तव्य करून आहेत पनवेल मधील अलिबाग मधील समाज बांधव हा एकत्रित यावा, एकमेकांच्या विचारांचे आदान प्रदान व्हावे व अलिबाग मधील समाज बांधवांना हक्काचे कायमस्वरूपी एखाद्या सभागृह असावे यासाठी अलिबाग मधील रहिवाशी मोठ्या दिमतीने सरसावले आहेत. पनवेलमध्ये दहा गुंठ्याचा भूखंड घेऊन त्यावर अलिबाग भवन उभारावे ही संकल्पना मांडण्यात आली .ही संकल्पना सत्यात उतरावी यासाठी अलिबाग भवना करता लागणारा मोठा निधी संकलित करण्यासाठी विविध उपाय योजना आयोजित केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पनवेल मधील फडके नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी एका नाटकाच्या प्रयोग आयोजित केला आहे. या कार्यक्रमास पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या नाटकाच्या तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न हे अलिबाग भवनासाठी वापरले जाणार आहे. या नाटकाची तिकिटे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवून त्यामधून मोठा निधी संकलित केला जाणार आहे. यामध्ये मोठ-मोठे दानशूर व्यक्तींचाही सहभाग नोंदवला जात आहे. याकरता विशेष बैठकांचे आयोजनही पनवेलमध्ये करण्यात येत आहे .यासाठी मोठ्या संख्येने अलिबाग मधील रहिवाशी नागरिक तन-मन-धन अर्पण करून पुढे सरसावले आहेत.आपल्या हक्कासाठी आपल्या हक्काचे एखादे सभागृह अलिबाग भवन पनवेलला येणाऱ्या नागरिकांना राहण्याची उत्तम सोय व्हावी ,सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न समारंभ व अन्य कार्यक्रम करता यासाठी सुसज्ज असे सभागृह असावे अशी संकल्पना या अलिबाग भवन मधून साकारण्यात येणार असल्याचे आल्हाद पाटील यांनी सांगितले आहे.