पनवेल शहर पोलिसांनी टेम्पोसह जवळपास ८ लाख रुपये किंमतीचा गुटखा साठा केला हस्तगत..
पनवेल शहर पोलिसांनी टेम्पोसह जवळपास ८ लाख रुपये किंमतीचा गुटखा साठा केला हस्तगत
पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः पनवेल शहर पोलिसांनी जेएनपीटी ते पनवेल महामार्गालगत साईकृपा ढाब्याजवळ मागील 4-5 दिवसांपासून बेवारसरित्या उभ्या असलेल्या टेम्पोमधून तब्बल 4.35 लाख रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधीत तंबाखुचा साठा जप्त केला आहे. पोलिसांनी सदरचा गुटखा टेम्पोसह जप्त करुन टेम्पोच्या मुळ मालकाचा शोध सुरु केला आहे.
गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात विक्री तसेच खाण्यास बंदी असलेल्या गुटख्याची विक्री चोरट्या पद्धतीने होत असल्याने याबाबतच्या अनेक तक्रारी नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांच्या आदेशाने प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत अशा प्रकारे विक्री तसेच साठा करणार्‍या गुटखा माफीयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन ठाकरे, पोनि बाळकृष्ण सावंत (गुन्हे), पोनि प्रवीण भगत (प्रशा) यांनी या गुटखा माफियांचा बिमोड करण्यासाठी पथके तयार केली होती. त्यानुसार पो.उप.नि.विनोद लभडे, पोहवा वाघमारे, पोहवा गंथडे, पोहवा म्हात्रे, पोहवा वायकर, पोहवा खरात, पोना देशमुख, पोना पारधी, पोशि दुधे, पोशि शिरोळे, पोशि कांबळे आदींच्या पथकाला अशा प्रकारचा  गुटख्याचा साठा असलेला टेम्पो पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेएनपीटी-पनवेल महामार्गालगत सर्व्हीस रोडवर असलेल्या साईकृपा ढाब्याजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार या पथकाने सदर ठिकाणी तो टेम्पो ताब्यात  घेतला असता त्यात तब्बल 4.35 लाख रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधीत तंबाखुचा साठा आढळुन आला. त्यानंतर पोलिसांनी सदर गुटख्याचा साठा टेम्पोसह असा मिळून 8 लाख 34 हजार 020 किंमतीचा ऐवज जप्त करुन टेम्पो मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


फोटो ः पनवेल शहर पोलिसांनी हस्तगत केलेला गुटखा
Comments