पनवेलमध्ये 'लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ' ; हजारों लाडक्या बहिणींचा उदंड प्रतिसाद..
जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तो पर्यंत योजना कुणीही बंद करू शकणार नाही- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना- आमदार प्रशांत ठाकूर 

पनवेल (प्रतिनिधी) भाजप महिला मोर्चाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल येथील 'लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ' कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने लाडक्या बहिणींनी उपस्थित राहून उदंड प्रतिसाद दिला. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अत्यंत उल्हासदायी वातावरणात झालेला हा कार्यक्रम जणू श्रावण महिन्यातील सणाचा साज लावणारा होता. यावेळी महिलांनी लाडके आमदार प्रशांत ठाकूर यांनाही राख्या बांधत हा आनंददायी सोहळा साजरा केला. 
           प्रदेश महिला मोर्चाच्या आवाहनानुसार उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने आमदार प्रशांत ठाकूर व भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील विरूपाक्ष मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने महिलांच्या भावना जाणून घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींशी थेट संवाद साधला. 
या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, एड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, मंजुषा कुद्रीमोती, पनवेल शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा राजश्री वावेकर, तालुकाध्यक्षा कमला देशेकर, माजी नगरसेविका, यांच्यासह महिला मोर्चाच्या जिल्हा पदाधिकारी, शहर व तालुका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, महायुती सरकारच्या माध्यमातून विविध जनकल्याणकारी योजना राज्यातील नागरिकांसाठी राबविण्यात येत आहेत. या योजना अविरतपणे सुरू राहतील. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्षम आहेत. नाहीतर त्यांच्या आधीचे मुख्यमंत्री घरून, फेसबुकवरून कारभार पहायचे. मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा हेही दमदारपणे काम करीत आहेत. देवेंद्रजींनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते, मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने न्यायालयात वेळवर वकील दिला नाही. त्यामुळे ते आरक्षण गेले. ‘मविआ’वालेच आरक्षण जाण्यासाठी दोषी आहेत. असे सांगतानाच आपला लोकप्रतिनिधी आणि भाऊ म्हणून जास्तीत जास्त विकासकामे व योजना अंमलात आणण्याचे काम सातत्याने करत आलो आहे, यापुढेही तसाच आशीर्वाद पाठीशी राहू द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी म्हटले की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महायुती सरकारने रक्षाबंधनाआधीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून भगिनींना ओवाळणी दिली आहे. तर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले.
              यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर रायगड जिल्ह्याशी संवाद साधताना पनवेल येथील सोनाली महाडिक यांनी, विरोधक ही योजना पुढे बंद होईल असे सांगत आहेत, ते खरं आहे का, असा प्रश्न विचारला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले कि,  तुम्ही चांगला प्रश्न विचारला. जोपर्यंत महायुतीचे सरकार आहेत तोपर्यंत हे पैसे तुम्हाला निश्चितपणे मिळतील, असे सांगत लाडकी बहीण योजना कायम ठेवणार असल्याची ग्वाही दिली. तसेच ललिता कदम यांनीही या वेळी उपमुख्यमंत्र्यांशी संवाद साधत माझ्या मुलीने म्हणजे तुमच्या भाचीने तुमचे खास आभार मानले आहेत, असे सांगितले.
या वेळी महिलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राख्या आणल्या होत्या, त्या राख्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर पनवेल विधानसभेचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर अर्थात सर्वांचे लाडके दादा, तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनाही महिलांनी राख्या बांधत त्यांचेही औक्षण केले. यावेळी विरुपाक्ष मंगल कार्यालयाचे दोन्ही सभागृह लाडक्या बहिणींच्या साक्षीने तुडुंब भरले होते. 
चौकट- महायुती सरकारने आणलेली लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी अफवा विरोधक पसरवत आहेत. सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, हे भाऊ कालही काही देत नव्हते आणि आजही काही देत नाहीत. तुमच्या आशीर्वादाने आपल्या सरकारने ३१ मार्चपर्यंतचे पैसे अर्थसंकल्पात ठेवले आहेत. अर्थसंकल्पात नियमाने एकाच वर्षाचे पैसे ठेवता येतात, जर पाच वर्षाचे ठेवता आले असते तर आताच ठेवून दिले असते. पण तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तो पर्यंत हि योजना कुणीही बंद करू शकणार नाही. - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  
Comments